

India energy self-reliance 2026
esakal
अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू असताना त्याची सर्वाधिक झळ भारतासारख्या ऊर्जेसाठी जगभरातील इतर देशांवर अवलंबून असलेल्या देशांना बसली आहे. नागरिकांना पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. ही स्थिती केवळ आपण ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण नसल्याने निर्माण झाली आहे.
जगात भू-राजकीय तणाव वाढत असताना ऊर्जासुरक्षेचा प्रश्न अधिकच महत्त्वाचा ठरतो. पश्चिम आशियातील अस्थिरता वाढल्यावर ऊर्जा संकटात सापडलेल्या अनेक देशांत भारताचाही समावेश झाला आहे. युद्ध सुरू असलेल्या प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर तेल व गॅसची वाहतूक होते. अशा परिस्थितीत भारतासारख्या ऊर्जेच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशाने खनिज तेल व ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणे ही केवळ आर्थिक गरज नसून, राष्ट्रीय सुरक्षेसाठीही ते गरजेचे आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खनिज तेल वापरणारा देश आहे. मात्र या मागणीपैकी जवळपास ८८ टक्के खनिज तेल भारताला आयात करावे लागते, तर देशांतर्गत उत्पादन फक्त सुमारे १२ ते १३ टक्के आहे. २०२३-२४मध्ये भारताने सुमारे २३.४० कोटी टन खनिज तेल आयात केले. याशिवाय नैसर्गिक वायूच्या बाबतीतही भारताची आयातीवरील निर्भरता वाढत असून, सुमारे ५० टक्के नैसर्गिक वायू आयात केला जातो.