Musical instrument withspiritual significance
Esakal
स्वानंदी गिरीश
भारतीय संस्कृती आपल्याला वाद्यांकडे केवळ ध्वनीनिर्मितीचं साधन म्हणून पाहायला शिकवत नाही, तर त्या त्या सणांची, उत्सवांची, प्रदेशांची ओळख म्हणून वाद्यांकडे पाहायला शिकवते. श्रद्धेची अभिव्यक्ती आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा म्हणून पाहायला शिकवते. आणि हेच आपलं सर्वात मोठं संचित आहे असं वाटतं.
भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव अतिशय उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. त्या सणांशी असंख्य गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. सणांची रंगत वाढवणाऱ्या वाद्यांचा उपयोग केवळ मनोरंजन म्हणून केला जात नाही, तर त्यांचा धार्मिक विधींसोबत, पारंपरिक नृत्यासोबत सुंदर मिलाफ घातला जातो. भारतीय संस्कृतीत वाद्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं दिसतं. इतकं की आपल्या देवी-देवतांच्या हातातसुद्धा काही वाद्यं दिसून येतात! ज्ञान आणि कलेची देवता असणाऱ्या देवी सरस्वतीच्या हातातली वीणा सप्तसुरांची निर्मिती दर्शवते, विष्णूच्या हातातला शंख पवित्र नाद निर्माण करतो, प्रेमाचा आणि आनंदाचा संदेश देणाऱ्या कृष्णाच्या हातातली बासरी मधुरतेचं प्रतीक समजली जाते, तर शंकराचा डमरू लय दर्शवतो. नारदमुनींच्या हातातल्या चिपळ्या आणि वीणा संकीर्तनाचं महत्त्व सांगतात.