

Indian Handicrafts Heritage
esakal
काळाचा अखंड प्रवास आणि बदलांची प्रक्रिया अटळच असली, तरी फक्त एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून भारतीय हस्तकलांचं अस्तित्व राहू नये. अनेक आव्हानं, अडचणी चिवटपणे पार करत, भवतालाशी जुळवून घेत, सौंदर्य आणि समृद्धीचा चिरंतन अनुभव देणाऱ्या हस्तकलानिर्मितीच्या रंगीबेरंगी कहाण्या यापुढेही सतत लिहिल्या-सांगितल्या जायला हव्यात. त्यांचा प्रवास यापुढेही शतकानुशतकं सुरूच राहायला हवा.
आयुष्य सुंदर आणि समृद्ध करणाऱ्या गोष्टींमध्ये कलेखेरीज दुसरी एखादी गोष्ट क्वचितच असेल. भारतात तर विविध कलांची प्रदीर्घ परंपरा आहे. मानवी वंशाच्या इतिहासाइतकाच इथला कलेतिहास प्राचीन आहे. भारतातल्या नैसर्गिक आणि भौगोलिक विविधतेइतकंच प्रांतोप्रांतीचं कलाविश्व वैविध्यपूर्ण आणि मनोहारी आहे. या कलांनी भारताचा संपन्न सांस्कृतिक वारसा टिकवला आहे आणि तो अखंड पुढेही नेला आहे. संगीत, नृत्य, नाट्य, अशा ललित कलांखेरीज देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेल्या विविध हस्तकलाही भारतीय संस्कृतीच्या प्राणधारांना शतकानुशतकं संजीवक श्वास पुरवत आल्या आहेत. ‘मानवी चैतन्य आणि माणसाचे हात एकत्र येतात, तेव्हाच खरी कलानिर्मिती होते,’ असं लिओनार्दो दा व्हिंची म्हणतो, तेव्हा तो हस्तकलांच्या जिवंतपणाची खूणच स्पष्ट करत असतो.