बेहराम खोडाईजी
कोरोना उद्रेकानंतर देशातील बहुतांश रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या परदेशी रुग्णांची संख्या अत्यल्प होती. २०२१ आणि २०२२ अशी दोन वर्षे वैद्यकीय पर्यटनाच्या देशातील उलाढालीला मोठा फटका बसला होता.
आता मात्र या क्षेत्राला नव्याने गती मिळत आहे. त्यासाठी सरकारी धोरणे, खासगी रुग्णालयांचा विस्तार आणि अद्ययावत तंत्रज्ञान हा त्रिवेणी संगम परिणामकारक ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते.
देशात फेब्रुवारी २०२०पासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. महाराष्ट्रातला पहिला रुग्ण पुण्यात ६ मार्च २०२० या दिवशी आढळला. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात रुग्णांची संख्या दुप्पट वेगाने वाढू लागली.
रुग्णालयांमध्ये येणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी वेळेत झपाट्याने वाढले. रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयात बेड उपलब्ध नव्हते. अत्यवस्थ रुग्णांना आयसीयू बेड मिळत नव्हते.