emotional indian story
Esakal
गौतम पंगू
खऱ्या लिबर्टी बेलला जसा तडा गेला आहे तसाच तडा या प्रतिकृतीवरही कोरला होता. रेणू त्याच्यावरून बोट फिरवत राहिली. नवीननं गिफ्ट देताना केलेला विचार तिला खोलवर स्पर्शून गेला आणि तिच्या काळजात एक अनामिक कळ उठली.
प्राजक्ता हळूहळू चालत खुर्चीवर येऊन बसली तशी सोफ्यावर सेलफोनवर काहीतरी वाचत बसलेली रेणू डोळ्यांवरचा चष्मा काढत उठली. किचनमध्ये जाऊन एका ट्रेमध्ये प्राजक्ताचा ब्रेकफास्ट घालून ती तो बाहेर घेऊन आली आणि तिनं ट्रे प्राजक्तासमोर ठेवला. ॲव्होकॅडो टोस्ट, उकडलेलं अंडं, ब्लूबेरीज, ऑरेंज ज्यूस आणि चहा. शेजारीच चहा घेत लॅपटॉपवर काम करत बसलेल्या आदित्यला प्राजक्ता म्हणाली, “बघितलंस आदि, आईला इथं येऊन फक्त आठवडा झालाय, पण ती एवढ्यातच आपल्यापेक्षा जास्त अमेरिकन झालीये!”
“हो ॲव्होकॅडो टोस्ट मस्त झाला होता. तुम्ही भारतातसुद्धा करता का?” आदित्यनं विचारलं.
“नाही रे, परवाच एका आर्टिकलमध्ये रेसिपी वाचली म्हणून ट्राय करून बघावीशी वाटली,” रेणू पुन्हा सोफ्यावर बसत म्हणाली.
“अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा, आमची चंगळ होईल!” आदित्य लॅपटॉप बंद करत उठला,”चला मी तयार होतो. सेव्हन्टी सिक्सवर ट्रॅफिक वाढायच्या आत निघायला हवं.”
“मलाही आज बॅक टू बॅक मीटिंग्ज आहेत यार!” टोस्टचा घास घेत प्राजक्ता म्हणाली,”आई तू हवं तर नेटफ्लिक्सवर काहीतरी बघ. फक्त आवाज थोडा कमी ठेव म्हणजे मला आत डिस्टर्ब होणार नाही.”
“ॲक्च्युली मी म्हणत होते आज फिलाडेल्फिया डाऊनटाऊनमध्ये फिरायला जाते. तिथं बघण्यासारखं किती काय काय आहे!”
“आज? पण तुम्ही जाणार कशा? मी आज तुम्हाला सोडू शकणार नाही. हवं तर वीकेंडला प्लॅन करू शकतो.” आदित्य म्हणाला.
“अरे नाही, कुणी सोडायची गरज नाहीये. मी इथली लोकल ट्रेन घेऊन जाईन. शेड्यूल बघितलंय मी,” हातातला सेलफोन दाखवत रेणू म्हणाली,” तुमच्या घरापासून मॅलव्हर्न स्टेशनपर्यंत चालत जाईन आणि तिथून ट्रेन घेऊन डाऊनटाऊनमध्ये जेफरसन स्टेशनला उतरेन. तिथून पायीच फिरेन. आणि कुठं चुकलेच तर माझ्याकडं फोन आहे आणि त्यावर गूगल मॅप आहे.”
आदित्य आणि प्राजक्तानं एकमेकांकडं बघितलं.
“अरे वा, आई तू तर अगदी साईटसीईंगला आलेल्या सराईत टूरिस्टसारखं प्लॅनिंग वगैरे करून ठेवलंयस!” प्राजक्ताच्या बोलण्यात उपरोधाची छटा होती का, रेणूला वाटून गेलं. पण ती काही बोलली नाही.