

Indian Stock Market
esakal
डॉ. अमेय खरे
चांगला क्रेडिट स्कोअर तयार करणं हे एका दिवसाचं काम नसतं. तो हळूहळू आर्थिक शिस्तीतून तयार होतो. ईएमआय आणि क्रेडिट कार्ड्सची पेमेंट्स वेळेवर करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खूप जास्त कर्ज घेणं टाळायला हवं. याशिवाय, अनेकदा लोक नको असतानाही वारंवार कर्जासाठी अर्ज करतात. प्रत्येक अर्जाची नोंद होत असल्यामुळे त्याचाही परिणाम स्कोअरवर होऊ शकतो.
काही वर्षांपूर्वीपर्यंत कर्ज मिळवण्यासाठी मुख्यतः ओळख, स्थिर नोकरी किंवा बँकेशी असलेले संबंध महत्त्वाचे मानले जायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. आता बँका आणि वित्तीय संस्था आपल्याकडे पाहताना एक वेगळा आकडा पाहतात, तो म्हणजे ‘क्रेडिट स्कोअर’.
आज घर कर्ज असो, वाहन कर्ज असो किंवा अगदी क्रेडिट कार्ड घ्यायचं असो; अशा अनेक आर्थिक निर्णयांमध्ये क्रेडिट स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावतो. काही वेळा चांगलं उत्पन्न असूनही कर्ज मंजूर होत नाही, तर काही लोकांना तुलनेनं कमी व्याजदरावर कर्ज मिळतं. यामागं अनेकदा क्रेडिट स्कोअरचा मोठा प्रभाव असतो. म्हणूनच क्रेडिट स्कोअर हा केवळ बँकिंग क्षेत्रातला तांत्रिक शब्द राहिलेला नाही. तो हळूहळू सामान्य माणसाच्या आर्थिक प्रतिमेचा भाग होत आहे.