

Nifty Market Prediction :
esakal
भूषण महाजन
गेले दोन महिने आम्ही निवडक ब्लू चिप व मिड, स्मॉल व मायक्रो कॅप शेअरची खरेदी करण्यास सुचवतो आहे. प्रथम सुचवला तेव्हा स्मॉल कॅप निर्देशांक १४५०० होता, तो आता १७७०० झाला आहे व पुढे किमान हजार अंश जाण्यास जागा आहे. तसेच मायक्रो कॅप निर्देशांक १९५०० होता तो आता २५०००च्या पातळीच्या आसपास आहे. निफ्टी मात्र याच काळात २२१५२वरून २४००० (जवळजवळ ६.५ टक्के वाढ) झाली आहे.
म राठीत एक म्हण आहे, वरातीचे घोडे थांबत थांबतच जाणार! याचा अर्थ, कोणतेही महत्त्वाचे व मोठे काम हळूहळू आणि अनेक अडथळ्यांमधून पार होत पूर्णत्वास जाते. भारतीय शेअर बाजाराच्या तेजीचे असेच आहे. यावर्षीच्या २ जानेवारीला निफ्टीने २६३३५चा उच्चांक दिला खरा, पण त्यानंतर गेले साडेपाच महिने बाजार मंदीतच होता. एप्रिलच्या सुरुवातीला २२१५२ अंशाला स्पर्श केल्यानंतर निफ्टी एप्रिलमध्ये उसळली खरी, पण मे महिन्यात तिला पुन्हा तात्यांची नजर लागली आणि ती घसरायला सुरुवात झाली. २३०००ची पातळी तरी टिकते की नाही अशी स्थिती निर्माण झाली. कोपऱ्यात मुटकुळे करून बसलेले व येता-जाता मार खाणारे गावठी कुत्रेही नवी लाथ बसली तरी जागचे हलत नाही, तसेच आपल्या बाजाराने दाखवून दिले, की आता आम्ही अधिक मार खाल्ला तरी खाली जाणार नाही.
आज गेल्या सहा महिन्यांचे सिंहावलोकन करताना जाणवते, की मंदी संपत येऊन बाजाराची तेजीची वाटचाल सुरू झाली आहे. निफ्टी वरातीच्या घोड्यासारखी बातम्यांच्या तालावर नाचत, थोडी अडखळत आज ना उद्या नवा उच्चांक करणार हे नक्की!
निफ्टी प्रथम एप्रिल महिन्याच्या उच्चांकाचा अडसर दूर करेल आणि नंतर २६०००कडे कूच करेल. अर्थात हे काही अगदी सहज होणार नाही. मधेमधे युद्धच्या बातम्या खो देतीलच, पण शेवटी ते होणारच. परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीबाबत एक प्रसिद्ध पुढारी म्हणतात तसे ‘गेले ते कावळे, राहिले ते मावळे,’ असे आपल्याला म्हणता येईल. पण आता हे गेलेले गोरे कावळे परत येतील असे चिन्ह आहे. कदाचित नवे कावळे येतील, पण परदेशी संस्था नव्याने परततील असे दिसते. यासाठी एक वेगळेच नॅरेटिव्ह पुढे आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा बुडबुडा प्रत्येकालाच बोचतोय. आज ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या न्यायाने त्या क्षेत्रात खरेदी सुरू आहे.