

Indian Students Abroad Safety
esakal
परदेशात उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होण्याचे स्वप्न तरुणाई बाळगत असते. पण या स्वप्नांना धक्का लावणाऱ्या घटना पाहिल्या तर पालकांचे मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या सहा वर्षांत (२०१८ ते २०२४) परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या ८००हून अधिक भारतीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना धक्कादायक आहेतच, शिवाय परदेशातील भारतीयांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अर्थात अपघात होतो म्हणून प्रवास करायचाच नाही, असे होत नाही.
स न २०११च्या वर्षातील नाताळाचे दिवस. पुणेकरांना धक्का लावणारी एक घटना घडली. अनुज बिडवे नावाचा हुशार मुलगा जग बदलू शकेल असे एखादे उपकरण शोधण्याचे स्वप्न घेऊन ब्रिटनला गेला होता. पण २६ डिसेंबर २०११च्या (बॉक्सिंग डे) पहाटे त्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. लॅन्कॅस्टर विद्यापीठात मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेणारा २३ वर्षांचा अनुज त्याच्या आठ मित्रांसोबत मँचेस्टरमध्ये बॉक्सिंग डे सेलसाठी जात असताना साल्फर्डमधील ऑर्डसॉल लेन येथे गोळीबारात ठार झाला. या घटनेने ब्रिटनच नाही तर भारतही हादरला. पुण्याचा रहिवासी असलेला अनुज ही घटना घडायच्या केवळ चार महिने आधीच ब्रिटनमध्ये गेला होता.