
सारंग खानापूरकर
अखिल भारतीय व्यापार संघटनेच्या (सीएआयटी) म्हणण्यानुसार, भारतात विवाहाच्या हंगामात एक कोटी विवाह सोहळे होतात. मागील वर्षीच्या लग्नसराईत केवळ २३ दिवसांतच चार हजार अब्ज रुपयांची उलाढाल झाली.
सध्या सुरू झालेला विवाहाचा हंगाम नव्या वर्षाच्या स्वागतापर्यंत चालणार आहे. नंतर १५ दिवसांच्या खंडानंतर, १६ जानेवारीपासून, पुन्हा नवा हंगाम सुरू होत आहे. सणांचा काळ आणि विवाहाचे मुहूर्त एकत्र आल्याने खरेदीमध्ये प्रचंड वाढ होऊन भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
एकापाठोपाठ आलेल्या सणांचा मोसम संपला असला, तरी सदा फेस्टिव्ह मूडमध्ये असलेल्या भारतीयांचा उत्साह संपण्याची चिन्हे नाहीत. भारतात अातापासून ते पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत विवाहाचा हंगाम असणार आहे. घराच्या अंगणात आणि निवडक आप्तेष्टांच्या उपस्थितीत होत असलेल्या या घरगुती सोहळ्याचे रूपांतर आता अत्यंत भव्य हॉलमध्ये किंवा लॉनवर होणाऱ्या समारंभात झाले आहे.
विविध संस्कृतींचा जवळून परिचय होऊ लागल्याने त्याचाही प्रभाव एकमेकांच्या रूढी-परंपरांवर पडत आहे. विविध कारणांमुळे अनेकांकडे आर्थिक श्रीमंती आल्याने सण-समारंभांवर होणारा खर्चही सढळ हातांनी होऊ लागला आहे.
त्यामुळेच मागील काही वर्षांपासून विवाह सोहळे अत्यंत भव्य प्रमाणात करण्याची पद्धत रुजत आहे; परिणामी नवीनच बाजारपेठ उदयाला येत अर्थव्यवस्था वाढीलाही हातभार लागत आहे.