अर्थविशेष । भूषण महाजन
सेंटीमेंट बदलल्यामुळे व नव्या सुधारणांना मार्ग मोकळा झाल्यामुळे सावध तेजीचा पवित्रा योग्य राहील असे दिसते. हॉटेल, वाहने, फार्मा ह्यात तेजी दिसतेय, फक्त बँक निफ्टी अजून रंगात आली नाही. तिने साथ दिल्यास ऑक्टोबरपर्यंत नवा उच्चांक दूर नाही. तोपर्यंत बाजार एका टप्प्यात चालेल. फक्त हा टप्पा थोडा वर आला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
एकेकाळी देशात असा समज होता की सूर्यग्रहण लागल्यावर दानधर्म केला, तर ग्रहण सुटते व इडापिडा टळून कुटुंब ग्रहणामुळे होणाऱ्या आजारापासून दूर राहते. एका विशिष्ट समाजाला ते दान मागण्याचा अधिकार होता. आता तशी अंधश्रद्धा राहिली नाही व त्या समाजावरचे ते लांच्छन गेले. तसेच ग्रहणामुळे काही आजार होतात ही समजूतही कमी झाली. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे सध्या आपल्या देशालाही टॅरिफचे एक ग्रहण लागले आहे; ते सोडवायचे असेल, तर काहीतरी दान केले पाहिजे. म्हणजेच अमेरिकेला काय हवे आहे ते आपल्याला कमीतकमी त्रास होऊन कसे देता येईल, ह्याचा विचार केला पाहिजे.