संपादकीय
भारतानं १९७५ मध्ये ‘आर्यभट्ट’ उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणातून अंतराळयुगात पहिलं पाऊल टाकलं. त्या क्षणापासून आजपर्यंत आपण अनेक तांत्रिक चढ-उतार पार करत आलो आहोत. पण आता, पाच दशकांनंतर पहिल्यांदाच भारत निर्णायक टप्प्यावर उभा ठाकला आहे. आपण केवळ यंत्रं नव्हे, तर माणूस अंतराळात पाठवणार आहोत.
‘गगनयान’ मोहिमेद्वारे भारत स्वतःच्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची ऐतिहासिक क्षमता सिद्ध करणार आहे. ही मोहीम केवळ वैज्ञानिक कौशल्याचं किंवा तांत्रिक प्रावीण्याचं प्रतीक नाही, ही राष्ट्रस्वाभिमानाची वज्रप्रतिज्ञा आहे.
ही मोहीम म्हणजे फक्त प्रक्षेपण नव्हे, ती आपल्या विज्ञानदृष्टीनं झपाटलेल्या सामूहिक स्वप्नांच्या पूर्ततेची ध्यासगाथा आहे. त्यामुळे गगनयान ही फक्त प्रयोगशाळेतील सिद्धता नसून, ती प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणातील उत्कट अभिव्यक्ती आहे. त्यामध्ये आत्मगौरव आहे. दुर्दम्य आशावाद आणि जागतिक क्षितिजावर स्वबळाने उभे राहण्याचा निर्धार आहे.