

Maintaining Brand Trust Across Generations
esakal
आम्ही कपडे नेहमी अमुक दुकानातूनच घेतो, अमुक एखादी गोष्ट याच कंपनीची वापरतो, असे आपण नेहमी ऐकतो, बोलतोही. एखाद्या ब्रँडबाबत निर्माण झालेला हा विश्वास ग्राहकांच्या अनेक पिढ्या टिकून राहतो, यामागे असते मूल्यांची, तत्त्वांची, विश्वासार्हतेची पिढ्यान्पिढ्या केलेली जपणूक! असाच एक नामांकित ब्रँड म्हणजे चितळे बंधू. बाकरवडी आणि आंबा बर्फी या दोन पदार्थांसह मिष्टान्न, नमकीन अशा वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांनी ग्राहकांचे जीवन रुचकर करणाऱ्या या ब्रँडचा समृद्ध वारसा नव्या पिढीकडे आला आहे. हा वारसा ते कसे जपत आहेत, हे जाणून घेतले चितळे बंधूंचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे यांच्याकडून...
प्रश्न : जेव्हा एखादा प्रस्थापित ब्रँड पुढच्या पिढीच्या हाती सोपवला जातो, तेव्हा ब्रँडच्या मूळ मूल्यांमध्ये (Core Values) आणि आजच्या बाजारपेठेच्या मागणीमध्ये सुवर्णमध्य कसा साधता?
इंद्रनील चितळे : हे काम अतिशय नाजूक आणि संयमाचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आधीच्या पिढीने अपेक्षांबाबत पुरेशी स्पष्टता द्यायला हवी. ते एकदा निश्चित झाले आणि कालांतराने मार्गदर्शक चौकटी नीट आखल्या गेल्या, तर त्याचा फायदा घेण्याची ही एक उत्तम संधी ठरू शकते. खूप आधीपासून सुरुवात करणे, कल्पना नीट सिद्ध करणे आणि मगच मोठे प्रकल्प हाती घेणे हे महत्त्वाचे आहे. कारण नवी पिढी बहुतेकदा अगदी बायनरी म्हणजे ‘होय’ किंवा ‘नाही’ अशा निर्णयांकडे पाहते, पण वारसाहक्काच्या संस्थांमध्ये संस्कृती आणि माणसांच्या व्यवस्थापनाशी खूप संबंध असतो, जिथे ताळेबंदाच्या आकड्यांइतकीच धारणा निश्चिती (नॅरेटिव्ह बिल्डिंग) महत्त्वाची असते.