Interview with Chef Ranveer Brar : माझ्या आयुष्यातही तो टर्निंग पॉईंट ठरला आणि मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला

शेफ रणवीर ब्रार यांची मुलाखत
chef ranveer brar
chef ranveer brarEsakal

पूजा सामंत

जागतिक कीर्तीचा पण जन्माने, कर्माने भारतीय असलेला मास्टर शेफ रणवीर ब्रार याचा वेगळा परिचय काय करून द्यायचा? रणवीर उत्तम शेफ तर आहेच, पण तो कुकरी विषयावर अतिशय उत्तम लिहितोही. सोशल मीडियावरही रणवीरची चॅनल, व्हिडिओ विलक्षण लोकप्रिय आहेत. सध्या रणवीर ब्रार चर्चेत आहे तो त्याच्या फॅमिली टेबल या कौटुंबिक शोसाठी! त्यानिमित्ताने त्याच्याशी विविध विषयांवर भरपूर गप्पा झाल्या...

Q

फॅमिली टेबल हा शो स्वीकारण्यामागे काही विशेष प्रेरणा?

A

रणवीर ब्रार ः प्रत्येक कुटुंबात असे अनेक खास पदार्थ केले जातात, जे इतरांना माहिती नसतात. ते त्या कुटुंबातच राहतात. या पारंपरिक पाककृती अनेकदा काळाच्या पडद्याआड जातात. नव्या पिढीलाही त्याविषयी औत्सुक्य वाटावे; ते पदार्थ, त्यांच्या पाककृती नव्या पिढीने जाणून घ्याव्यात, असे पदार्थ करायला शिकावे असे वाटते. म्हणूनच अशा काहीशा विस्मृतीत गेलेल्या पदार्थांना फॅमिली टेबल शोमधून समोर आणतो आहे.

अलीकडे एकत्र कुटुंब मागे पडले आहे आणि एकल कुटुंबातही घरातील तीन-चार सदस्य एकत्र बसून जेवत नाहीत. प्रत्येकाच्या जेवणाच्या वेगवेगळ्या वेळा, सोशल मीडियात रमणारी नवी पिढी अशा अनेक कारणांमुळे कुटुंबे जेवणाच्या टेबलवर एकत्र बसत नाहीत. फॅमिली टेबल हा अशा कुटुंबांना एकत्र जोडणारा धागा आहे.

घरी टेबलवर सगळे जेवायला बसले, तरी ते हॉटेलच्या किंवा ढाबा फूडबद्दल बोलतात पण कौटुंबिक पारंपरिक पाककृतींबद्दल बोलत नाहीत, हा माझा अनुभव आहे. अशा हातून सुटत गेलेल्या अनेक गोष्टी फॅमिली टेबलमधून पाहता येतील. या शोमुळे पोटही भरेल आणि मनेही जुळतील याची मला खात्री वाटते. जी संभाषणे जेवणाच्या टेबलवर होतात ती अन्य ठिकाणी होत नाहीत.

Q

तुमच्या कुटुंबाचा आवडता पदार्थ कोणता? कोणत्या पदार्थाच्या स्मृती, त्याचा दरवळ तुमच्या मनाच्या कोपऱ्यात आजही जागा व्यापून आहे?

A

रणवीर ब्रार ः माझा जन्म लखनौचा. वडिलांचे नाव ईश्वर सिंग आणि आईचे नाव सुरिंदर कौर. आमचे एकत्र कुटुंब होते. आमच्या कुटुंबात पंधरा-वीसजण तरी असावेत. खूप धमाल करायचो आम्ही भावंडे. सख्खे-चुलत असा भेदभाव कधी केला नाही. घरात प्रेमळ आजोबा-आजी होते. कुटुंबातील लहान मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी आपसूकच त्यांच्याकडे असे. आमची बीजी (आजी) दर रविवारी राजमा चावल करत असे. एका रविवारी कढी चावल, एका रविवारी दाल मखनी-चावल वगैरे.

मी आख्खे जग फिरलोय, हिमालयात भ्रमंती केलीये, पण माझ्या बीजीच्या आणि पुढे आईच्या हातच्या राजमा चावलची सर कशालाच नाही. त्यामुळे माझा आवडता पदार्थ आणि आमची ‘फॅमिली डिश’ म्हणजे राजमा चावल, नंतर कढी चावल आणि मग दाल मखनी-चावल. आमच्या पंजाब्यांच्या घरी भात केला जात नाही, आम्ही रोटी खाणारे आहोत.

माझ्या लहानपणी तर भात घरात केला म्हणजे मोठी विशेष बाब, आम्हा लहान मुलांसाठी पर्वणीच! भाताचा वाटा जास्त मिळवण्यासाठी आमच्यात भांडणे होत असत. भात, त्यावर घरचे देसी घी, आले-लसणावर केलेला गरमागरम रस्सेदार राजमा... व्वा!! काय मज्जा यायची हे जेवताना! म्हणूनच आमच्या ‘फॅमिली टेबल’वरची ‘फॅमिली डिश’ म्हणजे राजमा चावल... आम्ही सकाळ-संध्याकाळ भात आणि राजम्यावर अगदी तुटून पडत असू.

Q

लखनौपासून सुरू झालेला तुझा प्रवास अल्पावधीत सातासमुद्रापल्याड गेला. अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांसाठी मेजवानी पेश केलीस... तुझ्या या प्रवासाबद्दल तुझ्या काय भावना आहेत?

A

रणवीर ब्रार ः प्रामाणिकपणे सांगतो, मला जे काही यश मिळाले आहे, त्यात मला नक्कीच समाधान आहे. मैं खुद को सिर्फ भाग्यशाली मानता हूँ । मुझ से कई अच्छे, होनहार शेफ हमारे देश में मौजूद है, जो मुझ से अच्छा और लजीज खाना बनाते है । असे उत्कृष्ट शेफ ढाब्यांवर, लहान-मोठ्या हॉटेलमध्ये आढळून येतात. अनेक स्त्रिया आपल्या कुटुंबासाठी सुगरण असतात. पण असे सगळे गुणी शेफ अज्ञात असतात, प्रकाशझोतात न आल्याने ते प्रसिद्धीपासून दूर असतात. मला प्रसिद्धी मिळत गेली, बरकत येत गेली, माझे नाव झाले, हा नशिबाचा खेळ आहे असे मी मानतो.

मेरे प्रोफेशन में मुझे अभी बहुत कुछ सीखना बाकी है ऐसा मैं विनम्रतापूर्वक कहता हूँ । पाना और सीखने में बहुत फर्क है । मैंने पाया है, अभी सीखा नहीं । सीखना बाकी है! सीखने में पूरी उम्र लग जाती है । बस मेरे साथ मेरे माता-पिता का आशीर्वाद है, जो मुझे यहाँ तक ले आया! अनेक क्षेत्रातील मान्यवरांसाठी मला रसोई करण्याची संधी मिळाली, त्यात पंतप्रधान, राष्ट्रपती, अनेक सेलिब्रिटी आहेत, हेदेखील भाग्यच!

Q

तू शेफ, लेखक, टीव्ही होस्ट, अभिनेता अशा विविध रूपांमध्ये दिसतोस. यातले तुला जास्त काय आवडते?

A

रणवीर ब्रार ः आय बिलिव्ह इन मोमेन्ट! मैं जिस मोमेंट में होता हूँ, मुझे वो मोमेंट अच्छा लगता है । इस वक्त आपसे बात कर रहा हूँ और इस बातचीत को मैं बेहद एन्जॉय कर रहा हूँ ! अगर मैं अपना कोई भी काम एन्जॉय न करू तो कुछ भी न करू! मी जे काम करतो त्यात मी शंभर टक्के, मग लेखक म्हणून पुस्तक लिहिणे असो, टीव्ही होस्ट असो, किचनमध्ये शेफ असो, पिता, पती, मुलगा माझ्या सगळ्या रूपांना मी यथोचित न्याय देतो. जो दिल कहे वो करो, वरना न करो, अशा प्रांजळ पण रोखठोक मताचा मी आहे.

Q

तुझी पत्नी पल्लवी महाराष्ट्रीय आहे ना? तुमच्याकडे मराठी पदार्थ होतात का?

A

रणवीर ब्रार ः माझी पत्नी पल्लवी जाधवदेखील फार उत्तम शेफ आहे. आम्ही दोघे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करत असताना आमचा परिचय झाला, प्रेम जमले आणि पुढे लग्न झाले. आम्हाला नऊ वर्षांचा मुलगा आहे. पल्लवी कोंबडी वडे करते ते मला प्रचंड आवडतात. तिच्यामुळे मला संपूर्ण मराठी खाद्यजत्रा समजली आणि मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल आवड निर्माण झाली. आमच्या घरातील स्वयंपाकघराचा ताबा पल्लवीकडे आहे आणि ती जे मराठमोळे पदार्थ करते, ते मी आणि आमचा मुलगा ईशान दोघेही एन्जॉय करतो.

Q

खाद्यपदार्थांचे ग्लोबल ट्रेंड्स कोणते? भारतीय अन्न परदेशातील मेन्यू कार्डावर प्रामुख्याने का दिसत नाही?

A

रणवीर ब्रार ः वैशिष्ट्यपूर्ण असे कुठलेही ग्लोबल ट्रेंड्स नाहीत! संपूर्ण जगभर सेल्फ डिस्कव्हरीचे प्रयोग चालू आहेत. प्रत्येक देशात, संस्कृतीत; राज्यात, घरात ज्याच्या-त्याच्या स्वतःच्या पाककृती असतात, त्यातल्या परंपरागत चालत आलेल्या असतात. अशा जुन्या पारंपरिक पाककृतींना नवा साज चढवला जातो. हम लोग खाने में संस्कार ढुंढने लगते है और संस्कारों में खाना ढुंढते है! भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते.

आपल्याकडे २८ राज्ये आहेत. त्या राज्यांमध्ये विविध खाद्यसंस्कृती आहे. इतकी विविधता जगात इतरत्र कुठेही नाही. त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थ जागतिक मेन्यू कार्डवर यायला वेळ लागला. पण आता परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. आज भारतीय पर्यटक संपूर्ण जगात फिरत आहेत आणि इडली, डोशापासून छोले भटुऱ्यांपर्यंत अनेक पदार्थ सर्वत्र मिळू लागले आहेत. यापुढचे चित्र अधिक सुखावह असणार यात मला शंका नाही!

Q

हल्ली शनिवार-रविवार हॉटेलमध्ये जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. हॉटेलांमधली गर्दी वाढते आहे. याचे कारण काय असावे? घरचे अन्न नकोसे असते का?

A

रणवीर ब्रार ः हो, वीकेंडला हॉटेलमध्ये जाण्याचा ट्रेंड आहे हे खरे.हल्ली करिअर करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. नोकरदार स्त्री म्हटली की तिचा संपूर्ण आठवडा कामात जातो. सकाळी चहा -कॉफी करण्यापासून ते सगळ्यांचे टिफिन, ब्रेकफास्ट अशा जबाबदाऱ्या सोमवार ते शुक्रवार असतातच. शिवाय ऑफिसही असते. घरच्या स्त्रीला आराम मिळावा, त्याचबरोबर हॉटेलिंगच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंबाचे आउटिंग असे यामागचे हेतू असतात.

हम सभी लोग एक चेंज चाहते है, रूटीन खाने से, रूटीन लाइफ से। इसलिए होटल में जाना एक ट्रेंड बनता गया । मैं खुद शेफ होकर यह कहता हूँ की घर के खाने को कोई बिट नहीं कर सकता । घर का खाना हर मामले में सबसे बेस्ट, हेल्दी और टेस्टी होता है । उस में माँ के हाथों का प्यार, बीवी की मेहनत सब शामिल है । आपण जेव्हा पर्यटनाला जातो तेव्हा आठवडाभर फिरतो, तिथले लोकल फूड टेस्ट करतो, एकूणच भटकंती हा आपला मोठा विरंगुळा असतो. पण चार-पाच दिवसांत आपल्यापैकी बहुतेकांना परतीचे वेध लागतात. घर आठवते. घरचे अन्न, अगदी वरण-भात असला तरी तो प्रिय वाटू लागतो आणि मग होमसिकनेस आणि घरच्या अन्नाची आठवण आपल्याला अस्वस्थ करते... हा मानवी स्वभाव आहे!

Q

हल्लीची लहान मुले आवडीने जेवत नाहीत, अगदी पाच-सहा वर्षांच्या मुलांनाही अन्न भरवावे लागते. अन्न खाताना लहान मुलांना मोबाईल दाखवावा लागतो. व्हिडिओ दाखवून त्यांच्या तोंडात घास घालावे लागतात. असे का होत असावे?

A

रणवीर ब्रार ः माझा मुलगा ईशानला जेवायला लावणे हा आजही आम्हा दोघांसाठी मोठा टास्क आहे. हल्लीच्या मुलांना त्यांना आवडेल तेच देणे गरजेचे आहे. मुलांना पास्ता, नूडल्स, पिझ्झा, बर्गर असे इन्स्टंट पदार्थ आवडतात, मग द्या त्यांना! फक्त घरी करा. पास्ता करताना तो पौष्टिक असावा. त्यांना पावभाजी द्या. नूडल्स करताना त्यात अनेक भाज्या शिजवून घाला. अशा पद्धतीने त्यांच्या आवडीचे पदार्थ, पण ते आपल्या पद्धतीने शिजवणे हाच त्यावरचा सोपा मार्ग आहे!

Q

तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट कोणता?

A

रणवीर ब्रार ः टर्निंग पॉइंट खरे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. हा टर्निंग पॉइंट माझ्या आयुष्यात आला, त्याक्षणी मी भानावर आलो. मला माझ्या जीवनात नेमके काय हवे आहे हे ते भान होते; तो साक्षात्कार होता असेच मी म्हणेन. वयाच्या २५व्या वर्षी मी नामांकित शेफ झालो.

प्रसिद्धी, पैसे, मानमरातब सगळे पायाशी लोळण घेऊ लागले. मनात कुठेतरी असे वाटू लागले, की अरेच्या मी तर सगळे अचिव्ह केले की. मी त्या काळात परदेशात होतो. पुढचा आणखी काळ मी परदेशात काढला आणि लवकरच माझ्या आई-वडिलांना खूप मिस करायला लागलो. शेवटी एक वेळ अशी आली की मला माझ्या आई-वडिलांची आठवण तीव्रतेने येऊ लागली.

ते वर्ष होते २०१२. मी अमेरिकेत होतो त्या काळात बोस्टनमधला हॉटेल बिझनेस, माझे रेस्टॉरंट डबघाईला आले होते. मला डिप्रेशन आले होते... माझ्या आई-वडिलांना भारतात सोडून मी इथे काय करतोय असे वाटू लागले. अशा अनेक विचारांनी डोक्यात काहूर माजले. एका क्षणी मी

भानावर आलो आणि याच निर्णयाला मी टर्निंग पॉइंट मानतो. मी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. बॅगा पॅक केल्या आणि बोस्टनहून मुंबईत आलो. मुंबईत आल्यावर जुहूच्या नोव्हाटेल हॉटेलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून माझी निवड झाली.

Q

पुढच्या योजना कोणत्या?

A

रणवीर ब्रार ः दुबईत माझे एक रेस्टॉरंट आहे. तिथे लवकरच आणखी दोन सुरू करतोय. येत्या पाच-सहा महिन्यांत माझे पुढचे पुस्तक प्रकाशित होईल. पुढे माझा हॉटेल बिझनेस वाढवायचा आहे. कुकरी विषयाशी संबंधित पुस्तके लिहिणार आहेच.

कुकरी शो होस्ट करतोय. फूड विषयाला वाहिलेले स्वतंत्र चॅनल सुरू करण्याचा मी विचार करत होतो, पण माझे स्वतःचे यूट्यूब चॅनल आहे, मग चोवीस तासांचे वेगळे चॅनल कशाला? म्हणून तूर्तास हा विचार सोडून दिलाय. यूट्यूब चॅनलसाठी खूपसा कन्टेंट तयार करतोय. खूप योजना आहेत, पाहू किती फलद्रूप होतील ते. वेळ कमी आणि कामे अगणित असे झाले आहे!

---------------------

chef ranveer brar
Recipe : पाऊस.. गरमागरम डाळ वडे, उपवासाचे रगडा पॅटिस आणि ब्रेड रोल..!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com