Share Market टाईम प्लीज 'मोड'वर आहे का? पहा तज्ज्ञ काय म्हणतात

अभ्यासपूर्ण व सावध गुंतवणूक करण्याचा धडा ह्या आठवड्यातील घटनांतून..
share Market
share Marketesakal

भूषण महाजन

शेअर बाजाराविषयी फार निराश होऊन चालणार नाही. एकतर चारही एक्के आपल्या हातात आहेत. चलनवाढ कमी होण्याची लक्षणे दिसत आहेत.

लहानपणी पकडापकडी, चोरपोलिस किंवा पळापळीचे कुठलेही खेळ खेळताना, आउट होणार असे वाटले अथवा तहान लागली, की आपण लगेच ‘टाईम प्लीज’ असे ओरडत खाली बसत असू आणि घराकडे पळत असू.

आजकाल क्रिकेटमध्येदेखील उगीचच समोरचा काळा पडदा (साइट स्क्रीन) हलल्यासारखा वाटतो, असे म्हणत क्षणभरासाठी टाईम प्लीज घेतात.

तसाच, शेअर बाजाराने टाईम प्लीज घेतला आहे असे वाटते. पण पूर्वी कधीकधी टाईम प्लीज थोडा मोठा असायचा. म्हणजे विराट कोहलीने टाईम प्लीज घ्यावा आणि तो परत येईपर्यंत उरलेली टीम आउट व्हावी, तसे काहीसे झाले.

सोमवारचा (ता. १२ फेब्रुवारी) शेअर बाजाराचा खेळ धडकी भरवणारा होता. निफ्टी फारशी खाली आली नाही, खरेतर गेल्या सहा-सात सप्ताहांत निफ्टी आहे तशीच जैसे थे आहे. किंबहुना किरकोळ खालीच आली आहे.

पण छोट्या गुंतवणूकदाराच्या लाडक्या मिड व स्मॉल कॅप शेअरना मोठा तडाखा बसला. हे दोन्ही निर्देशांक प्रत्येकी अडीच आणि चार टक्के खाली आले. ज्या प्रमाणात हे दोन्ही निर्देशांक वाढले होते ते पाहता खाली जायला अधिक वाव आहे, असे वाटते.

त्याजोडीला सरकारी कंपन्यांचे, विशेषतः वीज निर्मिती व वितरण क्षेत्रातील शेअर कोसळले. या क्षेत्राची भलावण आम्ही नेहमीच करत आलो आहोत. पण वाजवी किमतीच्या किमान दुप्पट भावाला यातील काही शेअर गेले होते.

वासरे आणि गाय यामधला फरक ओळखून त्यात जागरूकपणे निवड करणे आवश्यक आहे. उदाहरणच द्यायचे तर एनएचपीसी आणि सतलज जल निगमचे देता येईल. या शेअरचे पी/ई गुणोत्तर, ते दोन्ही समभाग सोमवारी २० टक्के खाली येऊनदेखील, २२ व ४७ च्या आसपास होते.

त्या तुलनेत कोल इंडिया व एनटीपीसी ९ आणि १५च्या पी/ईला मिळतात. शेतात पीक डोलायला लागले तर कापणीला फार उशीर करायला नको, कारण त्या पिकाला टोळधाडीपासून वाचवावे लागते, असे म्हणतात.

एकदा का टोळधाड आली, की काय राखायचे आणि काय सोडायचे ते कळत नाही. असेही म्हणतात, की तेजी जिन्याने एकेक पायरी चढत येते पण मंदी मात्र लिफ्टने खाली येते.

या लेखमालेतदेखील वेळोवेळी नफा वसुलीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पण तेजीवाल्यांचे शेअर बाजार खाली जातानाच विकले जातात हे कटू सत्य आहे.

वीजनिर्मिती क्षेत्र जसे विक्रीला सामोरे गेले तसेच रेल्वे व इतर सरकारी उद्योगांचे झाले. एनएचपीसीची भागविक्री सरकारने जाहीर करताच, आता आपली पाळी येणार असे वाटून खुराड्यात कोंबड्यांची जशी पळापळ होते तसे सर्वच सरकारी कंपन्यांचे शेअर खाली आले.

अशा अचानक विक्रीमुळे नवगुंतवणूकदाराला थोडेसे खजील व्हायला होते. हे टाळण्याचे दोन तीन उपाय आहेत.

सरकारी कंपन्याचे शेअर वर जात आहेत हे बघून सब घोडे बारा टक्के असे न करता थोडे चोखंदळपणे फंडामेंटल तपासून सल्लागाराच्या संमतीने घेतले तर फार निराशा होणार नाही. उलट या चढउताराचा स्वतःला फायदा करून घेता येईल .

आपला दृष्टिकोन पोर्टफोलिओ बांधण्याचा असला तर सरकारी कंपन्यांचे, किंवा कुठल्याही क्षेत्राचे पोर्टफोलिओत वजन किती ठेवायचे ते ठरवता येते.

उदाहरणार्थ, १० टक्के किंवा २० टक्के. त्याहून अधिक शक्यतो नको. त्याअधिक ठेवले असल्यास वेळोवेळी नफावसुलीची विक्री करून ते पुन्हा ठरवलेल्या टक्केवारीवर (दहा किंवा वीस टक्के) आणून ठेवावे.

म्हणजे बाजारात नफाही खिशात पडत राहतो व सरासरी खरेदीचा दरही कमी होतो. बाजाराच्या लहरीप्रमाणे वजन (पक्षीः त्याक्षेत्रातील शेअर) खाली गेल्यास तितकीच खरेदी करून पुन्हा अपेक्षित वजन गाठता येते.

दहा टक्के वजन असल्यास ते क्षेत्र २० टक्के जरी खाली आले तरी एकूण भांडारातील तोटा आटोक्यात (२ टक्के) दिसतो. असो.

पोर्टफोलिओत वैविध्य असणे महत्त्वाचे आहे ते या कारणाने. म्हणूनच म्युच्युअल फंडामार्फत गुंतवणूक केल्यास हे विनासायास साध्य होते.

पण स्वतःच प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास जागरूक राहायलाच हवे व विकत घेतलेल्या प्रत्येक शेअरचे मूलभूत मूल्यांकन व बाजारभाव सतत तपासून बघायला हवा.

शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही राखीव निधी नेहमीच जवळ असला पाहिजे, त्यामुळे मंदीच्या प्रत्येक आवर्तनात खरेदी करणे शक्य होते.

ह्याचाच व्यत्यास म्हणजे बाजाराच्या ह्या पातळीवर लिव्हरेज सौदे (फ्युचर वापरून) टाळावेत. तसेच आजकाल शेअर तारण ठेवून अत्यल्प व्याजात कर्ज देणाऱ्या अनेक संस्था आहेत. ते कर्ज घेण्याचा मोह टाळावा किंवा अत्यंत समयसूचकतेने वापरावा.

शेअर बाजाराविषयी फार निराश होऊन चालणार नाही. एकतर चारही एक्के आपल्या हातात आहेत. चलनवाढ कमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेने शेवटच्या तिमाहीचा चलनवाढीचा अंदाज ५.४ टक्के दिला होता.

प्रत्यक्षात जानेवारीची वाढ ५.१ टक्के आहे. (डिसेंबरचा महागाई दर ५.६९ टक्के होता.) रिझर्व्ह बँकेने व्याजदर जरी कमी केले नसले तरी आज न उद्या ते होणारच आहेत. अमेरिकी फेडने जर व्याजदरकपात केली तर आपल्याला करावीच लागेल.

चलनवाढ नियंत्रणात आली (रिझर्व्ह बँकेचे टार्गेट ४ टक्के आहे) तर दरकपात होणारच. किमानपक्षी व्याजदर यापुढे वरतरी नक्की जाऊ नयेत.

औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक वाढतो आहे. डिसेंबरमध्ये २.४ टक्क्यांवरून ३.८ टक्क्यांवर गेला आहे. बँकेत कर्जमागणी वाढती आहे व सरकारी धोरणसातत्य असेच पुढे चालू राहील, असा अंदाज आहे.

त्याचबरोबर जगाचा दादा असलेला अमेरिकी शेअर बाजार पूर्ण तेजीत आहे व नवनवे उच्चांक करतोय. भारतीय मासिक सीपचा ओघ ह्या महिन्यात ₹ १८ हजार कोटींवर पोहोचला आहे.

share Market
Share Market Closing: शेअर बाजारात प्रॉफिट बुकिंग, सेन्सेक्स 434 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

तात्पर्य असे, की प्लॅटफॉर्मवरून सुटली असे वाटणारी गाडी चक्क थांबली आहे. निफ्टीचा टप्पा मागेच केलेल्या अंदाजाप्रमाणे २१००० ते २२००० असाच राहणार आहे. त्यात २१५०० ही एक मोठी आधारपातळी आहे. आपली नजर निफ्टी व सेन्सेक्समधील शेअरकडे वळवावी हे उत्तम. लार्ज कॅप शेअर याआधीही सुचवले आहेत.

त्यातही मागे अभ्यासासाठी सुचविलेला कोटक बँक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नाही, असे दिसते. सर्वच बँकांना नव्या ठेवी गोळा करताना त्रास होतोय. त्यासाठी सेवा सुधारणे व नव्या कल्पना वापरून ‘कॉम्बो ऑफरींग’ देणे हा पर्याय उरतो.

आता बँकेतील ठेव व डेट फंडातील गुंतवणूक करदायित्वाच्या दृष्टीने एका पातळीवर आली आहे. त्यामुळे बँकांना तक्रारीला जागा नाही. ह्या महिनाअखेर सर्वच खासगी बँकांच्या कामगिरीचा आढावा घेऊ आणि ह्या गुंतवणुकीतून बाहेर पडायचे असेल तर पर्याय काय असावा ह्याचा विचार करू.

इथे एका टिव्ही चॅनेलवर दाखविल्या जाणाऱ्या व अनभिज्ञ गुंतवणूकदारांना अल्पकालीन सौद्याच्या शिफारशी करणाऱ्या काही तज्ज्ञांवर सेबीने केलेल्या कारवाईचा उल्लेख करायला हवा. सेबीकडे आता अत्यंत कार्यक्षम यंत्रणा आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेअरच्या भावातील चढउतार व त्यातून हाताच्या बोटावर मोजता येतील अशा निवडक लोकांना होत असलेला नफा सेबीच्या डोळ्यात आला. सेबीने सर्व कारस्थानाची पाळेमुळे खणून काढली.

टीव्ही वाहिन्यांवर शिफारस करण्याआधीच तज्ज्ञांच्या सग्यासोयऱ्यांनी तो शेअर विकत घ्यायचा आणि जनतेला कळल्यावर व शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यावर लागलीच तो विकून टाकायचा व झालेला नफा खिशात टाकायचा, अशी ती कार्यपद्धती होती.

हे नैतिकदृष्ट्या अत्यंत चुकीचे तर आहेच, पण मिळालेल्या लोकप्रियतेचा अत्यंत अयोग्य वापर आहे हे निश्चित. ह्या प्रकारात झालेला वारेमाप नफा ह्या सर्व तज्ज्ञांकडून वसूल करण्यात आला.

सर्वात महत्त्वाची बाब अशी, की जेव्हा टीव्हीवर एखादी खरेदीची शिफारस होते, तेव्हा आपल्याखेरीज इतर करोडो गुंतवणूकदार ती बघत असतात व त्याप्रमाणे कमी अधिक खरेदीही करत असतात. शेअर बाजारात पैसे मिळवणे इतके सोपे असते तर काय हवे होते? स्वतः अभ्यास करायलाच हवा.

मूलभूत अभ्यासाअंती शिफारस करताना हातात त्या कंपनीच्या कामगिरीचा आढावा असतो, पण आलेखावरून शेअर सुचविताना फक्त किंमत व तिचा कल व खरेदीविक्री मागील दिवसापेक्षा किती टक्के वाढली आहे, यावर विचार होतो.

मूलभूत कामगिरी विचारात घेतली जाईलच असे नाही. हर्षद मेहताच्या काळात बंद पडलेल्या कंपन्यांचे भाव देखील असे तेजीचा कल दाखवीत वर जात असत. तो इतिहास विसरता कामा नये.

अभ्यासपूर्ण व सावध गुंतवणूक करण्याचा धडा ह्या आठवड्यातील घटनांतून मिळो ही प्रामाणिक इच्छा!

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

---------------------------

share Market
Rajiv Jain On LIC Shares : माझं ते चुकलं...! अदानींना संकटातून बाहेर काढणाऱ्या राजीव जैन यांनी LIC वरून व्यक्त केला पश्चाताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com