Stock market
Esakal
अर्थविशेष । भूषण महाजन
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडे सारेच तज्ज्ञ निराशेने बघत होते. आता येथे पुढील वाटचाल कठीण आहे, त्यामुळे आपल्या भांडारातून हे शेअर वगळा असे काहींचे म्हणणे होते. त्यांना सपशेल खोटे ठरवीत ह्या क्षेत्राला नवी उभारी आली. ८ सप्टेंबर रोजी ३४३१० असलेला आयटी निर्देशांक आठवड्याभरात ३६११०वर पोहोचला. सप्ताहात सव्वापाच टक्क्यांची तेजी!
ता. १३ सप्टेंबरच्या अंकातील लेखात (बदतमीज़ दिल, बदतमीज़ दिल... माने ना) जो आशावाद दर्शवला होता, तो बऱ्यापैकी खरा ठरला. ३१ ऑगस्टला निफ्टीचा तळ २४४०४ अंशाचा होता. आमचे म्हणणे होते, की येथे जोखीम-परतावा गुणोत्तर (रिस्क-रिवॉर्ड) आकर्षक आहे. निफ्टी तीन ते पाच टक्के खाली येऊ शकते, पण ते सहन करण्याची तयारी असेल, तर वर जायला १३ ते १५ टक्के संधी आहे. गेले दोन-तीन महिने तेजीवाले आणि मंदीवाल्यांचे तुंबळ युद्ध सुरू होते. १ सप्टेंबरपासून निफ्टी तीन टक्के वर आली. निफ्टी वर आली तीदेखील ‘इंच इंच लढवू’ ह्या बाण्याने. रोजच शेअर बाजार वर उघडत असे व नफा वसुली होऊन दिवसभराच्या वरच्या पातळीच्या थोडा खाली बंद होत असे. त्यामुळे बाजाराला म्हणावा तसा गतीवेग मिळाला नाही.