

Japan East Asia security
esakal
रोहित वाळिंबे
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण जगाचे लक्ष तिकडे लागलेले असताना, जपानने लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र तैनात केल्यामुळे पूर्व आशियातील अस्वस्थताही चर्चेत आली आहे. या विभागातील बदलती भूराजकीय समीकरणे आणि सामरिक सुरक्षेच्या अनुषंगाने विविध राष्ट्रांच्या बदलत्या संरक्षण धोरणांचे प्रतिबिंब त्या घटनेत उमटले आहे.
जपानने नुकतेच नैऋत्येकडील तळावर ‘टाइप १२’ हे जमिनीवरून समुद्रातही मारा करण्याची क्षमता असणारे अत्याधुनिक क्षेपणास्त्र तैनात केले आहे. हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याचे असून, एक हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. जमिनीवरून समुद्रात मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे पूर्व चीन समुद्रातील मोठा प्रदेश जपानच्या माऱ्याच्या टप्प्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धापासून शांततेचे धोरण स्वीकारलेल्या जपानमध्ये काही वर्षांपासून आक्रमक धोरणासाठी आवाज उठविण्यात येत होता, त्याचे प्रत्यंतर या क्षेपणास्त्राच्या तैनातीमध्ये झाले आहे.
जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रिजने टाइप १२ क्षेपणास्त्र विकसित केले असून, ते आता कुमामोटो प्रांतातील कॅम्प केंगुन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. सध्या वेगाने बदलणाऱ्या भूराजकीय आणि सामरिक परिस्थितीमुळेच जपानने हा निर्णय घेतल्याचे मानण्यात येत आहे. जपानला सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षणात्मक बाजू मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलावे लागत आहे, असा दावा जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी केला आहे.