

Jeanne Baret: First Woman Circumnavigator
esakal
ही रोम हर्षक गोष्ट आहे; ३२९ पुरुष सहकाऱ्यांसह पहिलीवहिली पृथ्वी प्रदक्षिणा जिने केली, जगाला एक सुंदर, देखण्या वनस्पतीची ओळख करून दिली, लौकिकार्थाने जिला जगातील पहिली महिला वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणता येईल अशा एका स्त्रीची, जीन बॅरेची! खरेतर ही गोष्ट आहे लुई अॅन्टोईन डी बोगेनव्हिल, फिलीबर्ट कॉमर्सन आणि जीन बॅरे या त्रिकुटाची!
गोष्ट आहे १७६६ सालची. साधारण एप्रिलचा महिना. बौदेयूस आणि एटोइल ही दोन फ्रेंच जहाजे तब्बल ३३० प्रवाशांना घेऊन थेट पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज होती. या दोन जहाजांमधून विविध विषयांतील तज्ज्ञ, अधिकारी आणि इतरही प्रवासी प्रवास करणार होते. या मोहिमेत खरेतर एका दगडात किमान तीन पक्षी मारले जातील, या उद्देशाची निश्चिती अगोदरच झाली होती. ‘पृथ्वी प्रदक्षिणा’ या मोहिमेच्या मुख्य हेतूखेरीज फ्रान्सच्या सीमारेषा वाढविणे आणि जहाजाचा नांगर ज्या ज्या भूमीला म्हणून लागेल तिथल्या भूमीचा सर्व अंगांनी अभ्यास करणे हे हेतूदेखील होतेच. दोन्ही जहाजांचे नेतृत्व करणार होते लुई अॅन्टोईन दि बोगेनव्हिल. ‘बोगेनव्हिलची सफर’ म्हणूनच ही मोहीम बहुश्रुत आहे. हे नाव आपल्याला वाचताना परिचित वाटेल खरेतर. पण त्यावेळी बोगेनव्हिल यांनाही आपले नाव पुढील शेकडो वर्षे ‘यत्र तत्र सर्वत्र’ विविध खंडांमध्ये सहजपणे लोकांच्या तोंडी रेंगाळणार आहे हे माहीत असण्याचे काही कारण नव्हते.