Zenduchi Phule
Esakal
मंगला गोडबोले
सहसा आपण व्यक्तींचे, संस्थांचे शतकपूर्ती समारंभ प्रत्यही साजरे करतो. पण एखाद्या कलाकृतीची शताब्दी किंवा शतकपूर्ती साजरी करण्याचे प्रसंग अपवादाने येतात. बहुतेक कलाकृती आपापल्या कालखंडाशी जोडलेल्या असतात. तो तो कालखंड मागे पडला, की संदर्भ गमावून बसतात. आचार्य प्र. के. अत्रे किंवा कवी केशवकुमार यांचा झेंडूची फुले हा विडंबन काव्यसंग्रह हा मात्र तब्बल शंभर वर्षं पूर्ण करूनही आजही आपली टवटवी न गमावता टिकून आहे.
अवघी १०३ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. १९२२चा मे महिना सुरू होता. शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या होत्या. त्यामुळे चार-पाच शिक्षक मित्र सुट्टीची मजा लुटायला पुण्यात एकत्र यायचे, चहा पिणं-विड्या ओढणं आणि तोंडाला येईल ते बोलणं यात दिवस घालवायचे. त्याच सुमारास रविकिरण मंडळाचा एक चिमुकला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातली एखादी कविता हातात घ्यायची, अतिशयोक्त स्वरातून अंगविक्षेपांसह मोठ्यानं वाचायची, एकेक करत तिच्यातले दोष दाखवायचे आणि इतरांनी खिदळत बसायचं, असा त्यांचा उपक्रम चालायचा. या शिक्षकांमध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतले शिक्षक (पुढे तर मुख्याध्यापक) प्र. के. अत्रेही होते. त्यांनी या मेळाव्याला ‘पठाणक्लब’ असं नाव दिलं होतं. रविकिरण मंडळाचे सभासद नाजूक, सौम्य प्रकृतीचे म्हणून हे धट्टेकट्टे ‘पठाण’!
पहिले दोन-तीन दिवस अत्रे या गटात फार बोलत नव्हते. पण एके दिवशी त्यांना स्फूर्तीचा जबरदस्त झटका आला आणि त्यांच्या तोंडून विडंबनाच्या ओळीच्या ओळी उतरू लागल्या. त्या कवितांचे विषय, शब्दरचना, शाब्दिक दोष आणि त्या कवींचे स्वभाव किंवा वर्तन या सगळ्याची आपोआप खरमरीत हजेरी घेतली गेली. त्या ऐकताना सगळेच ‘पठाण’ खोखो हसत गेले, वेळप्रसंगी आपापला भराव घालत गेले. रिकामपणी केलेला हा व्रात्यपणा गटाबाहेरच्या कोणाला दाखवण्याचं धैर्य मात्र अत्र्यांमध्ये त्यावेळी नव्हतं. केवळ सात-आठ दिवसांमध्येच एकामागून एक कागदावर उतरवलेल्या त्या कवितांचं बाड पुढे तब्बल दोन-अडीच वर्षं त्यांनी स्वतःपाशीच ठेवलं. त्याची वाच्यता करून एरवी कवी म्हणून थोडंफार मिळवलेलं नाव घालवायची त्यांची तयारी नव्हती.