

John Painting and Urban Loneliness
esakal
ओजस कुलकर्णी
दिवसभरातली सगळी कामं संपवून तो एकटाच बसला होता; काही दिवसांपासून तो जिथं जायचा तिथंच. मोबाईलची बॅटरी तीन स्टेशनच्या अगोदरच संपलेली होती. डोळे असे कुणीतरी दोन्ही हातांनी दाबून बारीक केल्यासारखे थकलेले. आज ऑफिसमध्येही अनेकांशी प्रचंड वाद झाले होते. संध्याकाळी पाच वाजताच भूक लागली होती त्याला...
रंग नसलेली मळक्या भिंतीची एक खोली. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली, बेडशीट नसलेली एक गादी. गादीशेजारी अर्धवट राहिलेला रमचा प्लॅस्टिकचा ग्लास. प्लॅस्टिकच्या दुसऱ्या ग्लासात काळसर पाणी. त्यात सिगारेटची थोटकं. बाजूला एक मुलगा घोरत झोपलेला. त्याच्या शेजारी एका ताटलीत माशांचे काटे. त्यावर बसलेल्या माश्या, शेजारी संपलेला रमचा ग्लास. एकच खिडकी. त्या खिडकीला मळकट पडदा. त्या खिडकीबाहेर दिसणारा भरती आलेला, फेसाळ, रौद्ररूप धारण केलेला समुद्र आणि दुसरीकडे जमिनीवर उघडाबंब, लुंगी घातलेला, मांडी घालून कॅनव्हासवर मातकट रंगाचं टेक्स्चर पेंटिंग करत असलेला जॉन...
त्याला भान राहत नाही. चित्र काढताना एवढ्या सिगारेटी होतात की तो पूर्णपणे विसरून जातो. १२ वाजलेत. आजीचे असंख्य मिस्ड कॉल्स आहेत. त्या मोबाईलच्या व्हायब्रेशननं त्याच्या मित्राला जाग येते, पण जॉन मात्र मातीचं टेक्स्चर पूर्ण झालंय म्हणून लाल रंग कालवण्यात मग्न असतो. लाल रंग खरंतर मरून रंगासारखा दिसतोय म्हणून त्याला लाइट करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असतो. कॅनव्हास खूप छोटा आहे, त्यामानाने त्याने जरा जास्तच रंग घेतलाय. तीन-चार ब्रशेसपैकी एक ब्रश तो निवडतो आणि त्या मातीच्या टेक्स्चरवर अनेक लाल रंगाच्या रेषा ओढायला लागतो. सिगारेट संपते. दुसरी पेटवतो... तिसरी पेटवतो... आणि मग उरलेली रम एका घोटात संपवतो. चित्र पूर्ण झाल्यासारखं वाटत असतं, म्हणून तीन-चार वेळा त्या चित्राकडे बघतो. पण त्याचं मन अजून भरलेलं नसतं. म्हणून एक लाल रंगाचं डॉल्फिनचं छोटंसं लॉकेट तो त्यात मातीच्या टेक्स्चरमध्ये रेखाटतो. टचकन डोळ्यात पाणी येतं, म्हणून चित्रापासून लांब जाऊन तो खवळलेल्या समुद्रापाशी एकटाच झुरके घेत रडत राहतो. भानावर येऊन पुन्हा खोलीत येतो. शर्ट घालतो. मित्राला झोपेतून उठवतो. एक कचकचून मिठी मारतो. मोठ्ठी घट्ट मिठी. मित्राच्या डोळ्यात पाणी येतं. मित्र त्याला एक शेवटची बिडी ऑफर करतो. दोघेही शांत बिडी मारत बसतात.
‘‘जॉन? कीप मी पोस्टेड... पुणे इज व्हेरी ब्यूटिफुल... क्लायमेट इज लव्ह! देअर आर सो मेनी प्लेसेस टू रोम अराउंड! कोकण इज ऑल्सो नॉट सो फार... ॲण्ड डोन्ट मिस द फूड! यू हॅव टू अॅडजस्ट... डाउनलोड हिंज, टिंडर, बम्बल. आय नो यू विल गेट सो मेनी मॅचेस... ऑल्सो, वी सॉ द कम्युनिटी पेज ऑफ युअर एजन्सी... क्यूट गर्ल्स हं!’’ तिकडे चित्रावर, लाल रेघांवर आणि त्या लाल डॉल्फिनच्या लॉकेटवर माश्या बसल्याचं जॉनला दिसतं. तो ते चित्र मित्राला तिकडेच राहू द्यायची विनंती करतो आणि निघतो.
रस्त्यात ठिकठिकाणी दिसणाऱ्या बोर्ड्सकडे जॉनचं लक्ष जातं...
होर्डिंग १ :
GOD BLESS KERALA!
If you’ve lost everything,
Please contact us.
We are still learning how to turn sympathy into action.
‘‘In God’s Plan, Everything happens for a Reason.’’
बोर्ड््सकडे बघत बघत जॉन घरी येतो. हे त्याचं घर नसतंच. त्याचं घर म्हणजे... नारळाची झाडं, वाळत घातलेले मासे. शेजारी एक सुंदर पाट. त्यातून वाहणारं पाणी. त्या पाटाच्या कडेला बसलेले दाढी वाढलेले, दारू पीत असलेले जॉनचे वडील. जॉन त्यांना मागून जाऊन मिठी मारतो. दोघांमध्ये काहीही संवाद होत नाही. वाहणाऱ्या पाण्यासारखं दोघे फक्त शांतपणे रडत राहतात. एकदम जॉनचे वडील त्याला बाजूला ढकलतात, म्हणतात, ‘‘गेट लॉस्ट... बी अ मॅन! ॲण्ड डोन्ट कम हिअर. धिस इज नॉट हेवन. धिस इज हेल!’’ जॉन आत जाऊन आजीला भेटतो. आजीनं त्याला आवडतात तसे मासे केलेले असतात. खूप मनापासून जॉन जेवतो. फायनली आजीच्या कपाळाची पापी घेऊन जॉन त्याचं सामान त्याच्या लाल मारुती ८००मध्ये टाकायला सुरुवात करतो. फायनली जॉन गाडीत जोरात गाणी लावून मख्ख चेहऱ्यानं ते सुंदर केरळ मागे टाकून हायवेला लागतो.
होर्डिंग २ :
OUR BURGERS ARE SO GOOD
PEOPLE CAN’T KEEP THEIR HANDS TO THEMSELVES.
LONELY ON THE HIGHWAY?
TRY OUR FAMILY COMBO.
TASTE SO SATISFYING,
YOU’LL NEED A MOMENT ALONE.
रस्त्यात ब्रेक म्हणून समुद्रापाशी गाडी थांबवून हस्तमैथुन करतो. सिगारेट ओढतो. रात्रभर गाडी चालवतो. एका संध्याकाळी पुण्यात पोहोचतो.