आरोग्य। डॉ. प्रशांत मुंडे
वाढते वय, बदलती जीवनशैली, अपघात किंवा संधिवात यांमुळे अनेकांना गुडघा, खुबा, खांदा अशा महत्त्वाच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात. अशावेळी अवयवाची हालचाल थांबू शकते. अशा परिस्थितीत सांधे प्रत्यारोपण ही प्रभावी व सुरक्षित वैद्यकीय प्रक्रिया ठरते.
सांधे प्रत्यारोपण ही आधुनिक वैद्यकीय शस्त्रक्रिया आहे. झिजलेल्या, खराब झालेल्या किंवा दुखावलेल्या नैसर्गिक सांध्याऐवजी शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम सांधा (Prosthesis) बसवला जातो. हा कृत्रिम सांधा विशेषतः टिकाऊ आणि जैवसंगत साहित्यापासून (उदाहरणार्थ, धातू, उच्च दर्जाचे प्लॅस्टिक किंवा सिरॅमिक) तयार केलेला असतो.
गुडघा, खुबा, खांदा, कोपर किंवा मनगट हे सांधे वारंवार होणाऱ्या घर्षणामुळे झिजण्याची शक्यता असते. संधिवात (Osteoarthritis), संधिशूल (Rheumatoid Arthritis), अपघातानंतर झालेल्या इजा किंवा सांध्यांचे दीर्घकालीन आजार यामुळे या सांध्यांमध्ये वेदना, सूज येऊन हालचालींना अडथळा निर्माण होतो. अशा वेळी इतर उपचारांनी फायदा न झाल्यास सांधे प्रत्यारोपण हे अंतिम, पण प्रभावी पाऊल ठरते. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनामुक्त, गतिशील आणि गुणवत्ता असलेले आयुष्य मिळू शकते.