
श्रीकृष्ण यज्ञोपवीत
घरातच अडकवून ठेवणारा कोरोनाकाळ संपल्यानंतर केवडिया येथील सरदार पटेलांचे स्मारक, सोमनाथ, द्वारका, गीरचे अभयारण्य आणि अहमदाबादची सहल हा एक अत्यंत सुखद अनुभव ठरला.
सन २०२० फेब्रुवारीमध्ये आम्ही अंदमानची सहल केल्यानंतर जगभरात कोरोनाचे थैमान सुरू झाले. त्याकाळात घराबाहेर पडणे शक्यच नव्हते. त्यात ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून बंधने घालून घेतली होती. दोन वर्षे घरात राहून अतिशय कंटाळा आला होता.
जसजशी कोरोनाची (तिसरी) लाट ओसरत गेली आणि सरकारने बंधने बरीच कमी केली तशी एखादी ट्रिप करावी अशी चर्चा आमच्या मित्रमंडळीत सुरू झाली आणि त्यास मूर्त स्वरूप येऊन गुजरातमधील सरदार पटेलांचा पुतळा (स्मारक) पाहून सोमनाथ, द्वारका, जवळपासची प्रेक्षणीय ठिकाणे व जुनागढ येथील गीर जंगलाची सफारी करण्याचे ठरले.