

Junk Food Advertising
esakal
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे ‘लेट्स फिक्स अवर फूड या उपक्रमातून पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, पौष्टिक मूल्य कमी असलेल्या अन्नपदार्थांच्या (जंक फूड) आक्रमक जाहिरातींचा देशातील ६७.६ टक्के किशोरवयीन मुलांच्या अन्ननिवडीवर घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. ही देशातील मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब म्हणता येईल. एकेकाळी वाढदिवस, सहल किंवा विशेष प्रसंगी खाल्ले जाणारे पिझ्झा, बर्गर, चिप्स, नूडल्स, चॉकलेट्स आणि कोल्ड ड्रिंक्स आता मुलांच्या दैनंदिन आहाराचा भाग झाली आहेत. सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट (सीएसई), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) इत्यादी आरोग्य संस्थांच्या सर्वेक्षणांमधून समोर आलेली आकडेवारीही भारतासाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
सीएसईच्या सर्वेक्षणानुसार भारतातील ९० टक्क्यांहून अधिक मुले पॅकेज्ड जंक फूडचे नियमित सेवन करतात. त्यापैकी ५३ टक्के मुले दररोज किमान एकदा अल्ट्रा-प्रोसेस्ड किंवा फास्ट फूड खातात. जवळपास ६८ ते ६९ टक्के मुले आठवड्यातून अनेक वेळा साखरयुक्त शीतपेये पितात. ग्रामीण भागातील चित्रही फार वेगळे नाही. तेथील सुमारे निम्मी किशोरवयीन मुले आठवड्यातून दोन ते तीन वेळा चिप्स, चॉकलेट्स किंवा आइस्क्रीमचे सेवन करतात. हे सर्व करताना त्यांच्या निवडीवर जाहिरातींच्या माऱ्याचा अधिक प्रभाव असतो, ही अधिक चिंताजनक आहे.