life after retirement
Esakal
सुप्रिया देवस्थळी
होऊ या रिटायर, नंतर बघू काय करायचं ते. आत्तापासून काहीतरी निश्चित करायचा अट्टाहास कशाला? नोकरीत असतानाच्या आयुष्याचा वेग आणि रिटायरमेंटनंतरचा वेग ह्यात फरक असू दे की! छान ३१ तारखेला व्हावं रिटायर, आराम करावा काही दिवस आणि मग बघावं पुढचा मार्ग काही दिसतोय का. आणि एकच एक पर्याय निवडायला पाहिजे असंही नाही. कुठं फार बांधून घ्यायला नको ही मुख्य गरज होती. बाकी कुठलंही काम करायला आवडेलच.
सकाळचे नऊ वाजून गेले होते. ऑफिसला जाण्यासाठी आता निघायला हवं होतं, पण आज ज्योत्स्नाताईंचा मूड वेगळाच होता. सकाळपासूनच विचारांची चक्रं गरागरा फिरत होती डोक्यात. सरकारी सेवेतून निवृत्त व्हायला आता सहाच महिने शिल्लक राहिले होते. रिटायरमेंट जवळ यायला लागली, की रिटायरमेंटनंतरही काहीतरी पद, जबाबदारी मिळवण्यासाठी खटाटोप करणारे खूपजण त्यांच्या आसपास होते. त्यांच्या भाऊगर्दीत ज्योत्स्नाताई कुठेच नव्हत्या. त्यामुळे रिटायरमेंटनंतरचं आपलं आयुष्य कसं असेल ह्याचा विचार आता त्या करायला लागल्या होत्या. साठीमध्येही त्यांचा फिटनेस व्यवस्थित होता. अजून काही वर्षं त्या सहज आत्ताइतक्याच झपाट्यानं काम करू शकल्या असत्या. पण सरकारच्या अजस्र यंत्रणेत आता स्वतःला बांधून घ्यायला नको, असंही त्यांना वाटत होतं. त्यांचे वडीलही सरकारी नोकरीतच होते; अर्थात ज्योत्स्नाताई जेवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचल्या तेवढ्या वरिष्ठ पदावर ते नव्हते. आई गृहिणी होती. पण त्या दोघांचेही आपल्या मूळ गावाशी संबंध घट्ट होते. त्या गावातल्या शाळेला मदत करायची, एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मदत करायची अशी छोटी-मोठी कामं ते दोघं सतत करत असायचे. त्यांच्यासारखंच एखाद्या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करण्याचा पर्यायही ज्योत्स्नाताईंसमोर होता.