मीरा जोशी
बेन, साद्री आणि देवमासे या कथेला ढासळत्या पर्यावरणाची पार्श्वभूमी तर आहेच, शिवाय गेल्या चार-पाच दशकांपासून कोसोवो, अल्बानियामधून रोजगाराच्या शोधात स्वित्झर्लंडमध्ये दाखल झालेल्या स्थलांतरितांच्या स्थितीकडेही लेखिका लक्ष वेधू इच्छिते. या दोन्ही विषयांचे हटके पद्धतीने मिश्रण करताना लेखिकेने फॅन्टसीबरोबरच, युवा वाचकांना जवळची वाटेल अशी भाषा वापरली आहे.
गोष्ट आहे दोन देवमाशांची, गोष्ट आहे बेन आणि साद्री या स्वित्झर्लंडमधल्या दोन जिवलग मित्रांची, पण तशी ती आपल्या सर्वांच्याच भवतालाची. काट आणि लिव अशा नावांचे दोन देवमासे. दोघेही मृत झालेत आणि ते निघालेत त्यांच्या पुढच्या, म्हणजे अनंताच्या प्रवासाला. पण या प्रवासादरम्यान ते एकमेकांशी बोलत, गप्पा मारत निघालेत.