

Darwin Climbing Plants
esakal
डॉ. मंदार दातार
उष्णकटिबंधीय आफ्रिका आणि आशिया हे खंड कळलावीचं घर. आपल्या सह्यादीत, विदर्भात, दख्खनच्या माळरानांवर कळलावी आढळते ती काटेरी झुडपांत, जंगलाच्या कडांवर एक कंदयुक्त वनस्पती म्हणून. पावसाळ्यात अचानक उगवणारी, फुलणारी आणि परत जमिनीत जाणारी ही अजब वनस्पती आहे.
थो र माणसं एखाद्या महाप्रचंड, जग बदलून टाकणाऱ्या कामातून बाहेर पडल्यानंतर विश्रांती म्हणून काय करतात? तर दुसरं काम हाती घेतात. अवघ्या वैज्ञानिक विश्वात खळबळ माजवणाऱ्या आणि भविष्यातील विज्ञानाचा प्रवाहच बदलून टाकणाऱ्या ओरिजिन ऑफ स्पिशीज या १८५९मध्ये आलेल्या ग्रंथानंतर उत्क्रांतिवादाचा पिता मानल्या जाणाऱ्या चार्ल्स डार्विननं नजर टाकली ती आपल्या परिसरात वाढणाऱ्या वेलींवर. वेली स्वतः उभ्या राहू न शकणाऱ्या आणि आधार कसा शोधावा या विवंचनेत असणाऱ्या वनस्पती. डार्विननं त्याच्या विश्रांतीकाळात केलेल्या अभ्यासातून एक अद्वितीय पुस्तक जन्माला घातलं - द मूव्हमेंट्स ॲण्ड हॅबिट्स ऑफ क्लायम्बिंग प्लांट्स. डार्विननं १८६५मध्ये लिहिलेलं हे पुस्तक त्याच्यासाठी एक आनंददायक अनुभव होता. डार्विन म्हणतो, वेली चतुर आहेत. खोड तयार करण्यासाठी काळ आणि ऊर्जा खर्च न करता, शेजाऱ्याच्या खांद्यावर उभं राहून प्रकाश मिळवणं त्यांना सहज जमलं आहे. निसर्गामध्ये जगण्याच्या स्पर्धेतली ही एक सर्वोत्तम रणनीती आहे. डार्विन या वेलींचं कौतुक करताना अजिबात थकत नाही. तो पुढे लिहितो, ‘निसर्गाच्या साम्राज्यात वर झेपावणाऱ्या वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या सर्वात सुंदर अनुकूलनाचं एक उदाहरण आहेत वेगवान वाढणाऱ्या वेली. अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करूनही पावसाळ्याच्या मध्यावर आपल्याला फळं देणाऱ्या श्रावण घेवडा, भोपळा, कारली यांसारख्या विलक्षण वनस्पती या वेली आहेत. ‘आजोबा कोय पेरतील, तर नातू फळं खाईल’ या टेस्ट क्रिकेटच्या शैलीच्या विपरीत टी२० खेळणाऱ्या या वनस्पती आहेत.