buddhist caves
Esakal
अमोघ वैद्य
कान्हेरीच्या डोंगराच्या विविध स्तरांवर विखुरलेल्या विहारांच्या दुनियेत पावलं टाकल्यावर एका वेगळ्याच काळात आणि एका विस्मयकारक संस्कृतीत प्रवेश केल्याचा अनुभव येतो. या भव्य डोंगर उतारावर खोदलेल्या विहारांतून म्हणजेच भिक्षूंना निवास देणाऱ्या खोल्या आणि विश्रांती केंद्रांतून जसे आपण पुढे जातो, तसतसं त्या इतिहास, ध्यानमग्नता आणि साधना प्रतिबिंबित करतात.
निसर्गाच्या सौम्य स्पर्शानं व्यापलेल्या डोंगराच्या कुशीत, मुंबईच्या बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत कान्हेरीच्या डोंगरावर प्राचीन बौद्ध लेण्यांची शांतता दाटलेली आहे. वाळूच्या दगडात खोल कोरलेल्या या गुहांची दीर्घ शतकं भरलेली गूढता आणि भव्यता मनाला वेधून घेते. मुंबईच्या गर्दीतून थोडं दूर, उंचीवरून जिथं निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा संगम दिसतो, तिथं या लेणी त्यांच्या मूक, पण खोल गुजांनी पर्यटकांच्या मनात स्थिरता भरतात.
गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी आणि महालक्ष्मी मंदिर यांच्या झगमगाटात यांची ओळख कमी झाली असली, तरी या डोंगरावर विखुरलेल्या १०९ लेण्यांमधील प्रत्येक शिल्प आणि कोरवट्या मनाला एक वेगळा श्वास देतात. दुर्गमता आणि माहितीच्या अभावामुळे या ठिकाणाला लोकांच्या मनात स्थान मिळालं नाही, पण हे ठिकाण पाहायला आलेल्या प्रत्येकाला नव्या आशेनं या लेणी भारून टाकतात.
कान्हेरी हे पूर्वी शूर्पारक (सोपारा), वस्य (वसई) आणि कालयाण (कल्याण) या महत्त्वाच्या बंदरांच्या अगदी जवळचं स्थान होतं. या जिल्ह्यातील या स्थानिक बंदरांशी असलेल्या जवळीकीमुळे कान्हेरीनं अनेक काळ सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्व कायम राखलं. हे बौद्ध धर्मप्रसारकांचे विश्रांतीस्थळ होतं आणि साधना व ध्यानसाधनेसाठीचं एक प्रमुख केंद्रही!