

Kant Philosophy
esakal
रुसोला शांततेत स्वारस्य असल्यामुळे त्याने आधी पेरीच्या मतांची सकारात्मक मांडणी केली, इतकी तद्रुपतेने, की एखाद्याला ते रुसोचेच मत वाटावे. वस्तुतः तसे वाटल्यामुळेच की काय, त्याच्यावर टीकाही झाली. अशा आणि इतर काही कारणांमुळे कांटच्या राजकीय आणि विशेषतः शांतीसंबंधीच्या मतांची चर्चा करताना रुसोचा संबंध व संदर्भ सोडता येत नाही.
मार्क्स हा कांटसारखाच विश्वकुटुंबवादी/ विश्वनागरिकतावादी (Cosmopolitian) होता. विश्वात शांती नांदावी अशी त्याचीही इच्छा होती याबाबत संशय घ्यायचे काही कारण नाही. तसेच दोघांच्याही मते सध्याचे जग युद्धसन्मुखच आहे. मात्र मार्क्ससाठी विश्वाचा कारभार एकछत्री होण्यासाठी सर्वत्र श्रमिकांचे राज्य यायला हवे. त्यांच्याच हातात सत्ता असायला पाहिजे. तथापि, हा एक अपरिहार्य असा ऐतिहासिक टप्पा झाला. समाजात मुळात श्रमिक आणि भांडवलदार मालक अशी विभागणीच असता कामा नये अशी अवस्था ही समाजवादी समाजरचनेची अंतिम अवस्था आहे आणि ती वर्गसंघर्षातूनच शक्य होणार आहे. तेव्हा राष्ट्रच काय पण सरकारसुद्धा कालबाह्य झालेले असेल! मार्क्स अशा प्रकारे अराज्यवादी (Anarchist) आहे.
कांटबद्दल असे म्हणता यायचे नाही. त्यालाही शांततामय जगच हवे होते. त्यासाठी राष्ट्रांनी, वर्गांनी युद्धे करावीत अशी तो (मार्क्सप्रमाणे) शिफारस करीत नाही. मात्र युद्धे झाली आहेत व होणार आहेत हे त्याला मान्य आहे. नाइलाज म्हणून. कारण मानवाच्या इतिहासाची चालच अशी आहे, की अशा प्रकारच्या अवांछनीय, अनिष्ट मानल्या गेलेल्या घटनांमधूनच पुढील वांछनीय, इष्ट अवस्थेची वाट सुकर होते. कांटची इतिहासाची स्वतःची अशी एक उपपत्ती आहे. हा इतिहास मानव घडवतो, अशा प्रकारचा संघर्ष हा त्याच्या स्वभावाचाच एक पैलू आहे, असे तो मानतो; पण मानव हा मूलतः बुद्ध्यनुसारी (Rational) आहे व म्हणून तो सार्वत्रिक (Universal) असा विचार करू शकतो, जो त्याच्या नैतिकतेला कारण ठरतो. म्हणून तर इतिहासातील युद्धाच्या एखाद्या-दुसऱ्या घटनांकडे सुट्या पद्धतीने त्यांना वेगळे करून पाहिले तर शांतता स्थापन होणे अशक्यप्राय असल्याचा समज होऊन नैराश्य येऊ शकेल. तथापि, मानवी इतिहासाकडे एक बुद्ध्यनुसारी चालणारी प्रयोजनात्मक प्रक्रिया म्हणून समग्रतेने पाहिले, तर असे संघर्ष अंतिमतः शांततेकडे, विश्वैक्याकडे नेणारे टप्पे असल्याचे दिसून येईल. इतिहास हा अशा प्रकारे ‘Providence’युक्त (दैवी योजना) असतो. त्यामुळे मानव वरपांगी असामाजिक (Unsocialable) वाटला तरी त्याच्या या unsocialityमध्येच त्याची socialability अनुस्यूत असते.