लेफ्टनंट जनरल, पी. आर. शंकर (निवृत्त)
मोठ्या तोफांसह लढणाऱ्यांनाच युद्धात जय मिळत असतो. कारगिलमध्ये भारतीय तोफखान्याने बजावलेली कामगिरी पाहता या वस्तुस्थितीला पुष्टी मिळते. विस्मयकारक हालचाली आणि व्यूहरचना विजय मिळवून देतात असे युद्धांचा आजवरचा इतिहास सांगतो.
कारगिलमध्ये तोफखाना इतक्या मोठ्या प्रमाणावर तैनात केला जाऊ शकतो, विशेषतः उंच पर्वतीय भागांमध्ये त्याचा वापर अशा पद्धतीने केला जाईल याची पाकिस्तानी घुसखोरांनी कल्पनाही केली नव्हती.
ते १९९९च्या मे महिन्याचे सुरुवातीचे दिवस होते. पाकिस्तानी घुसखोर नियंत्रणरेषा (एलओसी) ओलांडून आत घुसल्याचे आणि त्यांनी श्रीनगर ते लेह या राष्ट्रीय महामार्ग ‘१अ’लगतच्या अतिउंच भागांवर कब्जा केला असल्याचे उघडकीस आले होते. हा महामार्ग म्हणजे लेह आणि तिथे तैनात असलेल्या सैन्याची जीवनवाहिनीच. आणि नेमकी तीच तोडण्याचा पाकिस्तानचा इरादा होता.