Karnataka Trip : उंच डोंगरातून, घनदाट झाडीतून दिसणारा सूर्यास्त मन सुखावून गेला..

पाच दिवस, चार रात्रींकरिता उडुपी, शृंगेरी, होर्नाडू आणि चिकमंगळूर अशी ट्रिप होती.
श्रीकृष्ण मंदिर
श्रीकृष्ण मंदिरesakal

...पंधरा मिनिटे वाट पाहिल्यावर निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळाला. उंच डोंगरातून, घनदाट झाडीतून दिसणारा सूर्यास्त मन सुखावून गेला. सूर्यास्ताचा सुखद अनुभव घेऊन आम्ही परतलो.

संदीप कुलकर्णी

सन २०१८नंतर कुठेही ट्रिपला जाता आले नव्हते. पण यंदा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही एक छोटीशी ट्रिप करायचीच असे ठरवले. पाच दिवस, चार रात्रींकरिता उडुपी, शृंगेरी, होर्नाडू आणि चिकमंगळूर अशी ट्रिप होती.

ट्रिप उडुपी टू उडुपी होती. त्यामुळे कोल्हापूर ते उडुपी प्रवास आमचा आम्हाला करायचा होता. खूप दिवसांनी बाहेर कुठेतरी जात असल्यामुळे मनात उत्साह होता. कोल्हापूरमधून रात्रीची बस पकडून आम्ही दुसऱ्या दिवशी उडुपीला पोहोचलो.

पहिला पॉइंट होता सुप्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिर. ज्या ट्रिपची सुरुवात इतक्या चांगल्या श्रीकृष्ण दर्शनाने होणार ती ट्रिप अविस्मरणीय झाली नसती तरच नवल! मंदिर खूप सुंदर आहे. स्वच्छताही छान होती.

मंदिरातील नक्षीकाम खूप सुंदर. दर्शन घेताना खूप समाधान वाटले. दर्शनानंतर प्रसाद मंडपात प्रसाद घेतला. तो सात्त्विक आहार घेताना पुन्हा एकदा मन तृप्त झाले. प्रसाद घेऊन बाहेरील दुकानांमध्ये घेतलेला शॉपिंगचा आनंद काही औरच.

श्रीकृष्णाची बासरी घेतली नाही, तर मग श्रीकृष्णाच्या मंदिरात गेल्याचे समाधान कसे मिळेल? शॉपिंग उरकून आम्ही मालपे बिचकडे निघालो. दुपारी एकची वेळ असूनही बीचवर जाण्याची आमची तयारी होती. आमच्याजवळ डोक्यावर घालायच्या टोप्या होत्या.

बीचवर फारशी गर्दी नव्हती. आम्ही समुद्राच्या आत-बाहेर करणाऱ्या लाटा पाहत होतो. अथांग पसरलेला समुद्र जणू काही मला माझ्या अथांग ध्येयाकडे जाण्याची वाटच दाखवत होता.

पाण्यात पाय बुडवून मी त्याचे विशाल रूप मनामध्ये साठवत होतो. किनाऱ्यावरील शिल्पकला आणि त्यासमोरील फोटोग्राफी एक सुंदर अनुभव देऊन गेली.

मालपे बीचचा निरोप घेऊन आम्ही हेरिटेज व्हिलेजच्या दिशेने निघालो. हेरिटेज व्हिलेजला एन्ट्री फी आहे. सुरुवातीला आत जाताना ही एवढी ₹ ३०० एन्ट्री फी जास्त आहे असे वाटत होते.

पण आलो आहोत तर पाहू तरी काय आहे, या उत्सुकतेपोटी आत गेलो. आत गेलो आणि खरंच सांगतो मंत्रमुग्ध झालो. ‘ओल्ड इज गोल्ड’ची अनुभूती देणारी ही वास्तू.

विविध प्रकारच्या जुन्या कलाकुसरीच्या इमारती, महाल, शिल्पकला, नक्षीकाम आपल्याला जखडून ठेवते. दोन तासांचा वेळ कसा आणि कुठे गेला हे कळले नाही. तिथे फोटोग्राफी करायला परवानगी होती, त्यामुळे भरपूर फोटो काढण्याचा मोह मला आवरता आला नाही.

पहिल्याच दिवशी मोबाईलची मेमरी संपेल की काय असे वाटू लागले. तिथे एकूण चोवीस ठिकाणे आहेत. आत जाताना क्यूआर कोड स्कॅन करून प्रत्येक ठिकाणची माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये आपल्याला मिळते.

ती वाचून आपण प्रत्येक ठिकाण पाहू शकतो. मला वाटते उडुपीमध्ये आल्यावर या हेरिटेज व्हिलेजला न चुकता भेट द्यायला हवी.

श्रीकृष्ण मंदिर
Chh. Sambhajinagar Tourism : पर्यटनस्थळी जा; पण स्वतःचे वाहन घेऊन!

जवळजवळ दोन तास पायपीट केल्यामुळे भूक लागली होती आणि त्यामुळे आम्ही नाश्ता करायला गेलो. मस्त मसाला डोसा आणि कॉफीचा आस्वाद घेऊन आम्ही पुन्हा एकदा समुद्र किनारी निघालो. कोप (Kaup) बीच उडुपीपासून ३५ किलोमीटरवर असणारा बीच.

शेजारी असणाऱ्या लाइट हाऊसवरून दिसणारा अथांग सागर आणि निसर्ग मनाला समाधान देत होता. खरेतर किनारा सोडून जाऊच नये असे वाटत होते, पण अंधार पडू लागला होता आणि शरीरपण आता साथ देत नव्हते.

परत समुद्र किनारी आलो. बीचवर भेळ खाल्ली नाही असे कसे चालेल? जाता जाता भेळेवर ताव मारून पहिल्या दिवसाची सांगता करून आम्ही हॉटेलवर परतलो.

दुसऱ्या दिवशी शृंगेरीच्या दिशेने निघालो. जवळजवळ दोन तास प्रवास होता. पण उडुपी सोडल्यावर लागणारे जंगल आणि त्यानंतर येणार घाट कायम लक्षात राहील.

घाटातील चौदा यू-टर्न, ‘जीव मुठीत घेणे’ म्हणजे काय याची प्रचिती देत होते. घाटाच्या शेवटी येणारा सनसेट पॉइंट दिवसासुद्धा खूप भावला. प्रवासात ही एक वेगळी अनुभूती घेत आम्ही शृंगेरीला पोहोचलो. शृंगेरी शारदा देवीचे मंदिर सुंदर कलात्मक आहे.

शारदा देवी म्हणजे पावित्र्याचा खळखळता झराच जणू. पवित्र दर्शनाने मन अगदी तृप्त झाले. मंदिरात पवित्र प्रसाद घेऊन आम्ही होर्नाडूच्या दिशेने निघालो.

वाटेत एका बाजूला उंच गगनचुंबी सुपारीच्या झाडांच्या बागा आणि दुसरीकडे कॉफीचे मळे... असा सुंदर निसर्ग जणू आमचे स्वागतच करत होता.

एक तास असा निसर्गमय प्रवास करून आम्ही होर्नाडूला पोहोचलो. थोडीशी विश्रांती घेऊन सायंकाळी सहाच्या सुमारास अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाला गेलो.

मला स्वतःला स्वयंपाकाची आवड असल्यामुळे अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाची ओढ होती. दर्शन घेतले; येणाऱ्या काळात माझ्या हातून अनेकांची भूक भागून ते तृप्त व्हावेत ही मनोकामना देवीच्या चरणी ठेवून आम्ही देवळातून बाहेर पडलो.

थोडीशी विश्रांती घेऊन पोटापाण्याची व्यवस्था करायला बाहेर पडलो. समोरच असणारे उपाहारगृह आम्हाला खुणावत होते. आमच्या सुदैवाने हे उपाहारगृह चालवणारा मूळचा सोलापूरचा होता.

तेथे रात्रीच्या जेवणात मस्त पोळी-भाजी मिळाली आणि अन्नपूर्णेच्या दारात आमचेही मन तृप्त झाले. अशारितीने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.

श्रीकृष्ण मंदिर
Tourism News: जगातलं सर्वात खोल सरोवर कोणतं आहे? जाणून घ्या त्याबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी

तिसऱ्या दिवशी चिकमंगळूरमध्ये आम्ही अकरा वाजता पोहोचलो. हॉटेल चेकइनकरिता वेळ असल्यामुळे आम्ही थेट महात्मा गांधी उद्यानात गेलो. उद्यानात जाण्यासाठी माफक एन्ट्री फी आहे. उद्यानाची सुंदर निगा राखलेली असल्याचे जाणवले.

उद्यानाच्या दरवाजात उभी असणारी छोटीशी ट्रेन मला माझ्या बालपणाची आठवण करून देत होती. आम्ही तिकीट काढून या ट्रेनची सफर करायला निघालो. उद्यानाला दोन फेऱ्या मारून ट्रेन थांबली. या सफरीत बोगद्यातून जाणे ही एक पर्वणीच होती.

उद्यानात कारंजे, शिल्पकलेचा आविष्कार असणारे पुतळे, पाण्याचा कृत्रिम धबधबा आणि तेथून दिसणारे शहराचे विहंगम दृश्य हे सर्व डोळ्यात साठवून आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो.

दुपारचे जेवण करून आणि थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही भद्रा फॉरेस्ट विभागातील कोपनगुंडी हिल पाहायला निघालो. एकपदरी वेड्यावाकड्या वळणांच्या लहान रस्‍त्यावरून सुंदर निसर्ग पाहताना दोन तास वेळ कसा गेला हे कळलेदेखील नाही.

साडेसहाच्या सुमारास टेकडीवर पोहोचलो आणि पंधरा मिनिटे वाट पाहिल्यावर निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहायला मिळाला.

उंच डोंगरातून, घनदाट झाडीतून दिसणारा सूर्यास्त मन सुखावून गेला. सूर्यास्ताचा सुखद अनुभव घेऊन आम्ही परत हॉटेलच्या दिशेने निघालो. ट्रिपचा तिसरा दिवस कसा संपला हे कळलेच नाही.

चौथ्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता उठून आम्ही मलयगिरी पर्वत शिखराकडे निघालो. मलयगिरी शिखर कर्नाटकातील सर्वात उंच शिखर. धुके, पहाटेची थंडी, वेडीवाकडी वळणे, अरुंद रस्ता आणि बेफाम निसर्गाचा आनंद घेत आम्ही एकदाचे पर्वताच्या शिखरावर पोहोचलो.

पर्वत रांगेतून दिसणारे निसर्गाचे मनमोहक रूप आणि समोर होणार सूर्योदय हे दृश्य सकाळी लवकर उठण्याचा शीण घालवून टाकण्यास पुरेसे होते.

शर्ट, टी-शर्ट आणि वर स्वेटर घालूनही प्रचंड थंडी वाजत होती, पण हा अनुभव अगदी कायमस्वरूपी मनात आणि आठवणीत साठवून ठेवावा असाच होता! पाय निघत नसतानाही पुढील प्रवासासाठी आम्हाला निघावे लागले.

नंतर आम्ही एका धबधब्यापाशी आलो. थंड वातावरणात थंड थंड पाणी कोसळताना बघून मन पुन्हा तृप्त झाले. धबधब्याजवळ असणाऱ्या एका हातगाडीवर थंडी घालवण्यासाठी गरम गरम बटाटा भाजी आणि कॉफीचा आस्वाद घेतला.

तेथून आम्ही बाबा बुदन गिरी आणि दत्तपीठ येथे पोहोचलो. येथून पुढे अजून एक धबधबा आणि निसर्गसौंदर्य दाखवणारा झेड पॉइंट आहे.

येथे आपल्या नेहमीच्या गाड्या जात नाहीत. येथे जाण्याकरिता खास जीप गाड्यांची सोय आहे. स्पेशल किंवा शेअरिंगमध्ये या जीप गाड्यांनी या दोन्ही ठिकाणी जाता येते.

श्रीकृष्ण मंदिर
Career in Tourism: जगभरात फिरा आणि सोबत पैसेही कमवा; 12वीनंतर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असं करा करिअर

हॉटेलवर आल्यावर थोडीशी विश्रांती घेतली. नाश्ता करून हॉटेलमधील ट्रॅव्हल डेस्कवर अजून काही पर्यटन स्थळे जवळ आहेत का याची चौकशी केली.

तीस-चाळीस किलोमीटरवर पुरातन काळातील काही सुंदर मंदिरे आहेत हे समजल्यावर आम्ही लगेच बाहेर पडलो आणि त्या दिशेने निघालो. सर्वप्रथम बेलूर येथे नऊशे वर्षांपूर्वीचे श्रीविष्णूचे मंदिर पाहण्यासाठी पोहोचलो.

सुंदर नक्षीकाम आणि कलाकुसर असणारे हे मंदिर वास्तुशिल्पकलेचा एक अद्वितीय नमुनाच म्हणावा लागेल. येथील लक्ष्मीचे मंदिरही खूप सुंदर आहे. येथून आम्ही हालेबेदू येथे होयसलेश्वर मंदिर येथे पोहोचलो.

मंदिरावरील नक्षीकाम, मंदिराबाहेर असणारी प्रशस्त बाग, बागेतील सुंदर झाडे, फुले, शेजारील तलाव आणि त्यातील बोटिंग हे सर्व मन सुखावून टाकत होते. मंदिरातील शंकराच्या पिंडीला भक्तिभावाने नमस्कार करून आम्ही देवळाबाहेर पडलो.

संध्याकाळी हिरेकोलाले तलाव पाहायला बाहेर पडलो. हॉटेलपासून साधारण पंचवीस मिनिटे दूर हा तलाव होता. स्वच्छ नितळ पाणी आणि आजूबाजूला सुंदर निसर्ग यामुळे मन अगदी ताजेतवाने झाले.

तलाव पाहून हॉटेलवर परतलो. चौथा दिवस खूप छान गेला होता. आत्ता आत्ता सुरू झालेली ट्रिप चार दिवस संपवून शेवटच्या दिवसावर येऊन ठेपली होती.

श्रीकृष्ण मंदिर
Winter Tourism : डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? मग, 'या' बजेटफ्रेंडली ठिकाणांचा करा विचार

पाचव्या दिवशी आम्ही चिकमंगळूरमधील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी, अर्थात कॉफी म्युझियम पाहायला निघालो. कॉफी ही चिकमंगळूर शहराची खरी ओळख. भारतात कॉफीची सरुवात याच शहरातून झाली, असा इतिहास वाचला होता.

कॉफी म्युझियममध्ये कॉफीची लागवड, कॉफीचा दर्जा, इतिहास आणि इतर अनेक प्रकारच्या कॉफीसंदर्भात माहिती व्हिडिओ, पोस्टर आणि डिस्प्लेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. तिथे शेजारीच असणाऱ्या कॉफी प्लान्टेशनमध्ये जाऊन कॉफीची झाडे जवळून पाहता येतात, फोटो काढता येतात.

कॉफी म्युझियमनंतर आम्ही मार्केटमधील एका कॉफी शॉपमध्ये जाऊन कॉफीच्या बियांपासून कॉफी कशी तयार होते ते बघितले. प्रथम कॉफी बिया निवडून चांगल्या बिया २५० डिग्रीपर्यंत गरम केल्या जातात. त्या बियांचा रंग डार्क ब्राऊन होतो.

मग त्या बिया ग्राइंडिंग मशिनमध्ये घालून त्याची पावडर केली जाते आणि मग ती पावडर पॅकिंग मशिनमध्ये घालून पॅक केली जाते. ही कॉफी मेकिंगची प्रोसेस पाहताना खूप मजा आली. येथून कॉफी खरेदी करून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो.

हा आमच्या ट्रिपमधील शेवटचा टप्पा होता, चिकमंगळूर ते (पुन्हा) उडुपी. अरुंद वळणावळणाच्या वाटा, सुपारी-कॉफीच्या बागा, सुंदर आकर्षित करणारी फुलझाडे, हिरव्यागार पर्वत रांगा यांचा आस्वाद घेत आम्ही उडुपीच्या दिशेने निघालो.

एका वळणावर कॉफी आणि चहाचे मळे समोरासमोर दिसले. एक परफेक्ट फोटो शूटिंग पॉइंट म्हणून आम्ही थांबलो आणि फोटोग्राफी केली. व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले. वाटेत आम्हाला एक सुंदर मंदिर दिसले. आम्हाला राहावले नाही आणि आम्ही नकळत त्या देवळाच्या दिशेने निघालो.

ते होते हरिहरपुर येथील प्रसिद्ध श्री आदी शंकराचार्य शारदा लक्ष्मीनरसिंह पीठ. नदीच्या काठी वसलेले हे सुंदर मंदिर. उंच मारुतीची मूर्ती, पुढे कासव, आजूबाजूला सुंदर बगीचा, शेजारी सुपारीच्या बागा अशी खासियत असणारे हे मंदिर.

कामधेनूची मूर्ती आणि ऋषी अगस्तींचा पुतळा हेदेखील या मंदिराची काही वैशिष्ट्ये. मंदिराची आठवण मनात ठेवून आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो.

वाटेत जोरदार पावसाने आणि घनदाट धुक्याने आमचे स्वागत केले. हा एकच निसर्गाचा आविष्कार आम्ही या पाच दिवसांत अनुभवला नव्हता, पण निसर्गाला तोही अनुभव आम्हाला द्यायचा होता.

संध्याकाळी साडेसहाची बस होती. साडेपाच वाजता उडुपीमध्ये पोहोचलो. बस वेळेत आली आणि आम्ही परत बॅक टू पॅव्हेलियन म्हणत कोल्हापूरच्या दिशेने निघालो.

------------------

श्रीकृष्ण मंदिर
Womens Tour : मैत्रिणींनो, इथे फिरा,खा मज्जा करा, हे आहेत तुमच्यासाठी सर्वात सुरक्षीत देश!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com