

Stock Market Investment
esakal
भूषण महाजन
रानभुलीत सापडल्यावर खुणेचे झाड शोधावे लागते. मोठ्या बँकांच्या गर्दीत असे लहान झाड कधीकधी नजरेतून सुटते. करूर वैश्य बँक ही उद्याच सुसाट धावणारी गाडी नाही; तिचा वेगच मुळात मोजूनमापून ठेवलेला आहे. पण चकव्यातून बाहेर पडायचे असेल, तर वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आणि येथे निदान दिशा तरी स्पष्ट दिसते.
‘रानभूल’ म्हणजे घनदाट जंगलात किंवा ओसाड भागात दिशाहीन होऊन गोलगोल फिरत राहणे आणि स्वतःचा रस्ता विसरून जाणे होय. याला ग्रामीण भागात ‘चकवा लागणे’ असेही म्हणतात. पारंपरिक समज असा आहे, की जंगलात एकट्या असलेल्या माणसाला कोणतीतरी अदृश्य शक्ती किंवा भूत दिशा दाखवण्याऐवजी दिशाभूल करते. माणूस एकाच जागेवर वारंवार फिरत राहतो आणि त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. आपण सारे रानात नाही, तर शेअर बाजाराच्या जंगलात आहोत आणि येथेही ‘बाजारभूल’ लागली की काय अशी शंका येण्याजोगी परिस्थिती आहे. कुठल्याही बाजूला वाट दिसत नाही. पाहता पाहता त्रैमासिक निकालांचा मोसम जवळपास संपला. साधारणपणे ही तिमाही कंपन्यांना गेल्या तिमाहीपेक्षा चांगली गेली असे म्हटले पाहिजे. गेले महिनाभर परदेशी संस्थांच्या विक्रीसमोर देशी खरेदी जास्त मोठी आहे, तरीही शेअर बाजार वरची वाट धरत नाही. बरे गाडी उताराला लागली म्हणावे तर अधूनमधून पुन्हा खरेदीचा जोर वाढतो व आशा पल्लवीत होऊ लागतात. अशावेळी काय करावे बरे? चकव्यातून बाहेर पडण्याचे काही पारंपरिक उपाय आहेत.