

Keoladeo National Park Bharatpur
esakal
इतर सर्व सगळ्या पक्षीवैभवाबरोबर केवलादेवचे खरे आकर्षण म्हणजे सारस पक्षी! पण मुळातच ज्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, असे सारस पक्षीदेखील अगदी सहज आढळतील असे नाही. बऱ्याच वेळा या अभयारण्यात अगदी कुठेतरी एक-दोन सारस आढळतात. आमच्या सुदैवाने आम्ही अगदी निवांतपणे सारसची फोटोग्राफी केलेली आहे.
भरतपूर हे केवळ नाव उच्चारल्यावरच आता केवलादेव राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे भरतपूर अभयारण्यच डोळ्यासमोर येते. याला कारणही तसेच आहे. हे भारतातील अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. सेंट्रल एशियन फ्लायवे या पक्षी स्थलांतराच्या आंतरराष्ट्रीय मार्गावरचे हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. स्ट्रॅटेजिक लोकेशन म्हणता येईल असे हे ठिकाण असल्यामुळे हिवाळ्यात इथे स्थानिक पक्ष्यांबरोबर स्थलांतरित पक्ष्यांचीही अगदी रेलचेल असते. खरेतर हे अभयारण्य राजस्थानच्या पूर्व भागात येते. पण उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा, मथुरा आणि फत्तेपूर सिक्री ही महत्त्वाची शहरे भरतपूरपासून केवळ पन्नास किलोमीटर अंतराच्या आतच आहेत. आम्हाला नाशिकहून आग्रा येथे जाणे सोयीचे असल्यामुळे आम्ही नाशिक-आग्रा-भरतपूर असा प्रवास करतो. अभयारण्यातच ‘फॉरेस्ट लॉज’ असल्यामुळे कधी तिथे मुक्काम होतो, तर कधी केवलादेव उद्यानाच्या परिसरात असलेल्या हॉटेल्सची निवड करतो.