‘जायंट किलर’ लक्ष्य सेन

इंडोनेशियन मास्टर्समधील उपांत्यपूर्व फेरी, थायलंड ओपनची उपांत्य फेरी आणि कॅनडा ओपनमधील विजेतेपद बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला दिलासा देणारे आहे.
winner badminton player lakshy sen
winner badminton player lakshy sensaptahik

किशोर पेटकर

इंडोनेशियन मास्टर्समधील उपांत्यपूर्व फेरी, थायलंड ओपनची उपांत्य फेरी आणि कॅनडा ओपनमधील विजेतेपद बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला दिलासा देणारे आहे. अजून काही महत्त्वाच्या स्पर्धा बाकी आहेत. मागील कमजोर खेळ साफ विसरून, मोसमाच्या उत्तरार्धात तो अधिक त्वेषाने खेळल्यास जागतिक मानांकन नक्कीच उंचावेल. कठीण लढायांनंतर गोड विजय चाखता येतात, असे सांगणाऱ्या लक्ष्यला त्याचे ध्येय माहीत आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा अगदी तोंडावर असताना ऑलिंपिक पात्रता वर्षात भारताचा युवा प्रतिभाशाली बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने कॅनडात शानदार कामगिरी बजावली. यंदाचा ऑल इंग्लंड विजेता चीनच्या ली शी फेंग याला दोन गेममध्ये २१-१८, २२-२० असे नमवून लक्ष्यने बीडब्ल्यूएफ सुपर ५०० दर्जाची प्रतिष्ठित कॅनडा ओपन स्पर्धा जिंकली.

सुपर ५०० गटातील स्पर्धा जिंकण्याची २१ वर्षीय लक्ष्यची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी गतवर्षी इंडिया ओपन स्पर्धेत तेव्हाचा जागतिक विजेता सिंगापूरचा लोह कीन येव याला हरवून लक्ष्यने कारकिर्दीतील पहिली प्रमुख स्पर्धा जिंकली होती.

गतवर्षी लक्ष्य जीवनातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. जर्मन ओपन उपांत्य लढतीत त्याने जागतिक क्रमवारीतील अव्वल डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनला हरविले. ऑल इंग्लंड स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले. शिवाय बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. थॉमस कप विजेत्या भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले.

गतवर्षीच त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन नोंदविताना जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी झेप घेतली होती. मात्र नाकावरील शस्त्रक्रियेनंतर त्याच्या खेळावर परिणाम झाला. सन २०२२मध्ये लक्ष्य धमाकेदार बॅडमिंटन खेळत होता, परंतु २०२३मध्ये आतापर्यंत जुना जोश दिसत नव्हता. कॅनडा ओपन स्पर्धेत उतरत असताना तो जागतिक क्रमवारीत तब्बल १९व्या क्रमांकावर घसरला होता.

मात्र आता कॅनडा ओपनमध्ये जायंट किलर ठरत त्याने गमावलेला आत्मविश्वास प्राप्त करण्यात यश मिळविले आहे. त्याची प्रतिक्रियाच तशी आहे. कॅनडा ओपन किताबानंतर लक्ष्य म्हणाला, ‘काहीवेळा कठीण लढायांनंतर खूपच गोड विजय मिळतात. प्रतीक्षा संपली आहे. कॅनडा ओपन विजेतेपदामुळे मी आनंदी आहे. शब्दांच्या पलीकडे कृतज्ञ आहे...’

आता लक्ष्यचे पुढील उद्दिष्ट निश्चित आहे, त्याला ऑलिंपिक पात्रता खुणावत आहे. कॅनडातील विजेतेपदामुळे आत्मविश्वास कमालीचा उंचावल्याचे सांगण्यास तो विसरला नाही. मध्यंतरीच्या अपयशामुळे हा गुणवान खेळाडू किंचित खचला होता, मात्र त्याने जिद्द गमावली नाही. प्रशिक्षक अनूप श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेत घसरलेला खेळ सावरला. कॅनडात त्याने अफलातून खेळ केला.

अंतिम लढतीत २३ वर्षीय सहा फूट उंचीच्या ली शी फेंगला नमविले. त्यापूर्वी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्न याचा पाडाव केला, त्यानंतर उपांत्य फेरीत जपानचा अकराव्या स्थानावरील केंतो निशिमोटो याला लक्ष्यने नमविले.

जबरदस्त कामगिरी

लक्ष्यने कॅनडा ओपनमध्ये जबरदस्त कामगिरीने विजेतेपद खेचून आणले. अंतिम लढतीत पहिला गेम त्याने २१-१८ असा जिंकला. या गेममध्ये त्याने सुरुवातीला ६-२ अशी आघाडी घेतली, मात्र नंतर ऑल इंग्लंड विजेत्या खेळाडूने १५-१५ अशी बरोबरी साधली. निर्णायक टप्प्यात लक्ष्यने लय गमावू दिली नाही. शैलीदार स्ट्रेट स्मॅशचा कल्पक वापर करत त्याने चिनी खेळाडू मुसंडी मारणार नाही याची दक्षता घेतली.

दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने कमालीची जिगर प्रदर्शित केली. १६-२० अशा पिछाडीवरून चार गेम पॉइंट वाचवत त्याने २०-२० अशी बरोबरी साधली आणि सलग दोन गुणांसह २२-२० फरकाने गेम जिंकत कारकिर्दीतील दुसऱ्यांदा सुपर ५०० स्पर्धा किताब पटकावला.

ताकदवान स्मॅशेस, वेग आणि चपळाई यामुळे लक्ष्यने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर ठसा उमटविला आहे. कॅनडा ओपनमध्ये त्याने प्रतिस्पर्ध्यावर पन्नास मिनिटांत विजय नोंदविला. गतवर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत बाजी मारल्यानंतर उत्तराखंडमधील हा खेळाडू यंदा प्रथमच अंतिम लढतीत जिंकला.

यावर्षी लक्ष्यने थायलंड ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती, परंतु त्याचा खेळ विशेष खुलत नव्हता. ही उणीव त्याने कॅनडातील कॅलगॅरी येथे भरून काढली. एकंदरीत भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूने २०२३ मध्ये जिंकलेली ही दुसरी स्पर्धा ठरली.

यावर्षी मे महिन्यात मलेशियन मास्टर्स स्पर्धेत भारताचा एच. एस. प्रणॉय विजेता ठरला होता. कॅनडा ओपनमधील लक्ष्यची जिद्द आणि जिगर वाखाणण्याजोगी ठरली. त्यामुळेच तो गमावलेला फॉर्म पुन्हा प्राप्त करू शकला.

आशियाई क्रीडा स्पर्धा असोत अथवा ऑलिंपिक स्पर्धा असोत, आता भारतीय खेळाडू या मानाच्या स्पर्धांत पदकाचे संभाव्य स्पर्धक आहेत. साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी यशोगाथा लिहिलेली आहे. भारतीय महिलांनी ऑलिंपिकमध्ये सलगपणे पदक जिंकण्याचा पराक्रम साधला आहे. भारतीय पुरुषही हा कित्ता गिरविण्यासाठी इच्छुक असून प्रणॉय, लक्ष्य, किदांबी श्रीकांत आदींकडे आश्वासकपणे पाहिले जात आहे.

स्वप्नवत वाटचाल, अडथळा, पुन्हा झेप

लक्ष्य सेन हा ज्युनियर गटातील माजी जागतिक अव्वल बॅडमिंटनपटू. सीनियर गटात पदार्पण करताना त्याने अपेक्षा पुष्कळ उंचावल्या. महत्त्वाचे म्हणजे त्याने विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. २०१९ साली सुपर १०० गटातील दोन स्पर्धा जिंकून लक्ष्यने जागतिक बॅडमिंटनला त्याची दखल घेण्यास भाग पाडले.

२०२१ साली त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, मात्र देशवासीय किदांबी श्रीकांतविरुद्ध पराभूत झाल्यानंतर त्याला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. २०२२ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील संस्मरणीय ठरले. राष्ट्रकुल क्रीडा सुवर्णपदक, थॉमस कप सांघिक विजेतेपद, इंडिया ओपन किताब यामुळे त्याच्या कारकिर्दीस सोनेरी झळाली लाभली.

त्याने ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला, पण जगातील अव्वल खेळाडू व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनचा अनुभव भारी ठरल्यामुळे लक्ष्यला इतिहास घडवता आला नाही. त्यापूर्वी याच अ‍ॅक्सेलसनला लक्ष्यने जर्मन ओपनच्या उपांत्य लढतीत नमवून कारकिर्दीतील मोठ्या विजयाची नोंद केली होती.

थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्न विरुद्ध हार पत्करल्यामुळे लक्ष्यला जर्मन ओपनमध्ये उपविजेतेपदावर राहावे लागले होते. आता कॅनडात त्याने उपउपांत्यपूर्व लढतीत त्या पराभवाची परतफेड केली.

नोव्हेंबर २०२२मध्ये लक्ष्य जगातील टॉप टेनमधील खेळाडू होता. मात्र, आलेख उंचावत असताना त्याच्या कारकिर्दीत अडथळा आला. २०२३मधील पूर्वार्ध निराशाजनक ठरला. लक्ष्यला मनाजोगता खेळ करता आला नाही. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

मलेशियन ओपनमध्ये त्याला पहिली फेरीही पार करता आली नाही, तर ऑल इंग्लंड ओपनमध्ये दुसऱ्या फेरीतच परतीचे तिकीट काढावे लागले. इंडोनेशिया ओपनमध्ये तो दुसऱ्या फेरीत हरला. या साऱ्या स्पर्धा सुपर १००० दर्जाच्या होत्या. इंडिया ओपनमध्ये दुसरी फेरी आणि नंतर सिंगापूर ओपनमध्ये पहिली फेरी ही त्याची सुपर ७५० दर्जाच्या स्पर्धेतील सुमार कामगिरी त्याच्या लौकिकास अजिबात साजेशी नव्हती.

जर्मन ओपन व स्विस ओपन या सुपर ३०० स्पर्धांतही तो पहिल्या फेरीनंतर खेळताना दिसला नाही. मात्र सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेत त्याने स्वतःला सावरण्यात यश मिळविले. मलेशियन मास्टर्समध्ये तो दुसऱ्या फेरीत गारद झाला असला, तरी इंडोनेशियन मास्टर्समधील उपांत्यपूर्व फेरी, थायलंड ओपनची उपांत्य फेरी आणि कॅनडा ओपनमधील विजेतेपद लक्ष्यला दिलासा देणारे आहे. अजून काही महत्त्वाच्या स्पर्धा बाकी आहे.

मागील कमजोर खेळ साफ विसरून तो मोसमाच्या उत्तरार्धात अधिक त्वेषाने खेळल्यास जागतिक मानांकन नक्कीच उंचावेल. कठीण लढायांनंतर गोड विजय चाखता येतात असे सांगणाऱ्या लक्ष्यला त्याचे ध्येय माहीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com