

Khidrapur Kopeshwar Temple
esakal
नंदिनी नरेवाडी
‘दक्षिण काशी’ असा मान असलेल्या कोल्हापूरची ओळख प्रामुख्याने करवीरनिवासिनी आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा यांच्यामुळे सर्वदूर पसरलेली आहे. याशिवायही कोल्हापूरचा संपूर्ण भूभाग प्राचीन शिल्पकला, गूढ इतिहास आणि निसर्गदत्त आध्यात्मिक स्थळांनी समृद्ध आहे. कृष्णेच्या काठावर बाराव्या शतकातील पाषाणकला जपणारे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर असो वा नृसिंहवाडीतील दत्तस्थान; या भूमीतील प्रत्येक मंदिराला स्वतःचा असा एक गौरवशाली इतिहास आहे. गगनबावड्याच्या डोंगरातील गूढ गुहा-मंदिरांपासून ते आजरा-चंदगडच्या डोंगरातील प्राचीन शिवपिंडींपर्यंत अनेक विस्मयकारक स्थाने या जिल्ह्यात आहेत. कात्यायनी आणि येळवण जुगाईसारखी जागृत शक्तिपीठे, कणेरी मठाचा सांस्कृतिक वारसा, कुंभोजचे बाहुबली तीर्थक्षेत्र आणि कसबा बीडच्या सातेरी डोंगरासारखी निसर्गरम्य देवस्थाने कोल्हापूरला अधिक समृद्ध करतात. डोंगररांगा, नद्यांचे किनारे आणि घनदाट जंगलांच्या कुशीत वसलेली ही मंदिरे केवळ धार्मिक श्रद्धेची केंद्रे नसून भारतीय स्थापत्यकलेचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत.
कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर
शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले कोपेश्वर मंदिर बाराव्या शतकातील शिलाहार आणि यादवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या पूर्वाभिमुख शिवमंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘स्वर्गमंडप’. या मंडपाचे वर्तुळाकार छत आकाशाकडे उघडे असून ते ४८ नक्षीदार दगडी खांबांवर तोललेले आहे. या मंदिरात महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. दक्ष यज्ञाच्या कथेनुसार, नंदी नारोबाच्या वाडीजवळील धोपेश्वर मंदिरात असल्याचे मानले जाते. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर गजथर (हत्तींची रांग), सुरसुंदरी, देव-देवता आणि रामायण-महाभारतातील प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत.