

Kolhapuri Dialect
esakal
कोल्हापूर जिल्ह्यात तालुका बदलला, की लहेजा बदलतो. कोल्हापूर जिल्ह्याची भाषिक गंमत अशी, की जिल्ह्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेल्यावर शब्द तेच राहतात, पण त्यांचा उच्चार, गती, स्वर व लहेजा बदलत जातो. कोल्हापूर शहर व करवीर परिसरातील बोलीला सर्वाधिक परिचित ‘कोल्हापुरी’ ठसका आहे. शहरातील प्रमाण मराठी, शिक्षण, माध्यमे आणि विविध भागांतून आलेले लोक यांमुळे भाषा संमिश्र झाली असली, तरी जुन्या भागात रांगडी छटा अजूनही स्पष्ट आढळते.
‘‘तुला आई हुडकालीया. कुठं गेल्तस?’’
‘‘क्रिकेट खेळायला गेल्तो. तुझं काम न्हवं ते. आई काय म्हणत हुती?’’
‘‘काय न्हाई. उद घालणार हाय तुला.’’
‘‘चिडलीया म्हणं की!’’
‘‘घरात गेलास की कळंलच. बा तर लयच तापलाय. न सांगताच कुठं पण जातईस म्हटल्यावर भडकणारच ते.’’
‘‘ते न्हवं. पण मी सांगून गेल्तो की दाद्याला. त्यो बोल्ला न्हाई काय?’’
‘‘ते काय म्हाईत न्हाई. घरात जा आधी. कसं शेकाटं बसत्यात बघ मग.’’
‘‘तुमी बघा मजा. आमी खातो मार.’’
हा संवाद ऐकला आणि चेहऱ्यावर हसू आलं नाही, तरच नवल! कारण या वाक्यांत केवळ संवाद नाही. त्यात कोल्हापूरचा स्वभाव आहे. थोडा रांगडा, थोडा मिस्कील, मनमोकळा, थेट आणि आपलेपणानं भरलेला. कोल्हापूरची भाषा ही केवळ बोली नाही; ती या मातीतल्या जगण्याची, नात्यांची आणि स्वभावाची ओळख आहे.
कोल्हापूरच्या भाषेला ‘रांगडी’ म्हटलं जातं. मात्र ‘रांगडी’ म्हणजे असभ्य किंवा अडाणी नव्हे. उलट या शब्दात मातीशी जोडलेपण, बेधडकपणा आणि कृत्रिमतेचा अभाव आहे. कोल्हापूरकरांच्या बोलण्यात शब्दांपेक्षा त्यांचा लहेजा अधिक बोलका असतो. ‘लय शहाणा हाईस’, ‘कवा रं’, ‘काय रं?’, ‘कुठं निघालास?’, ‘काय म्हणताय?’, ‘आरं बाबा!’, ‘व्हय की!’, ‘नाय गा!’, ‘हाय की!’ अशी सहज बाहेर पडणारी वाक्यं कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण करतात.