संकेत कृष्णात पाटील
समोरच्यानं वाक्याची सुरुवात, ‘आरं, ते नव्हं,’ अशी केली तर वाघ कोल्हापूरचाच किंवा वाघीण कोल्हापूरचीच हे स्पष्ट होतं. इथल्या भाषेत ग्रामीण बाज आहे, पण तो अप्रगत म्हणून भासवला जात नाही, तर अभिमानानं मिरवला जातो. कोल्हापुरी भाषा एकाच श्रद्धेने सहज बोलली जाते आणि त्याचा ना अविर्भाव बाळगला जातो ना लाज बाळगली जाते,
असते ती फक्त सहजता!
कोल्हापूर ऊर्फ ‘कोल्लापूर’च्या शब्दप्रपंचात तुमचं नादखुळा स्वागत आहे. महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीचा विषय सध्या चांगलाच गाजतोय. या विषयाच्या निमित्तानं राजकीय, आर्थिक, न्यायिक, तार्किक कवच बाजूला करून इथल्या लोकांची भावनिक संवेदनशीलता जर तुम्ही ढवळून पाहिली, तर माणुसकीचा रंकाळा तलाव तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल. प्रेम, आपुलकी, आदर, रांगडेपणा, चवदारपणा, दिलदारपणा, निवांतपणा, सहजपणा, समृद्धता आणि माणुसकीची भिंत तुम्हाला कुठं ‘गावल’ तर ती ह्याच मातीत! कोल्लापूरचं पाणी पिऊन, हवा खाऊन, मातीत बागडून, ‘जेवाण’ खाऊन माणूस लई भारी म्हटला नाही, तर ‘हान की बडीव, धुळ्ळा उडीव’ होण्याची दाट शक्यता आहे.
आता वरील वाक्य अतिशयोक्ती, उपहास आणि आवेशानं ओतप्रोत भरलं आहे, पण तुम्ही कोल्हापुरात पूर्ण नवीन असाल आणि तुमच्या डोळ्यावर कोल्हापूरविषयी ‘झापडं’ असतील, तर तुम्हाला त्यातील मजेशीरपणा जाणवण्याऐवजी धमकीवजा उर्मटपणा वाटेल. इथली भाषा आणि माणसं समजून घ्यायची असतील, तर शब्दाच्या मूळ अर्थासहित त्याचा स्थानिक बदललेला अर्थ, कोल्हापूरचा विशेष शब्द, समोरच्या व्यक्तीचा टोन ह्या लहानातलहान गोष्टी तुमच्या ‘डोस्क्यात मुंग्या आणायचं’ काम करतील. माझी लेखणी तुम्हाला कोल्हापूरचा रस्ता ‘दावल’, पण या साऱ्याचा अनुभव आणि अनुभूती मात्र तुम्हाला कोल्हापूरच्या गल्लीबोळांत फिरूनच घेता येईल. त्यामुळं एकदा कोल्हापूरला निवांत नक्की या!