

Kom Ombo Temple
esakal
विनोद द. मुळे
नाईल नदीच्या काठावरच वसलेल्या कोम ओम्बो शहरात आगळीवेगळी मंदिरं आहेत. ससाण्याचं डोकं व उर्वरित शरीर माणसाचं असलेल्या इजिप्तची प्राचीन संरक्षक देवता होरस आणि मगराचं डोकं व उर्वरित शरीर माणसाचं असलेली देवता सोबेक यांची मंदिरं बघण्यासारखी आहेत. ही दोन मंदिरं एकमेकांची हुबेहूब प्रतिकृती असून त्यांतील मूर्ती मात्र वेगळ्या आहेत.
मी सोळा-सतरा वर्षांचा असताना इजिप्तसह आफ्रिकेमधील जवळजवळ अकरा देशांची जीवनदायिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाईल नदीबद्दल एक जाडजूड पुस्तक वाचनात आलं. त्याच दरम्यान इजिप्तचा राजा तुतनखामेनच्या कबरीविषयीही एका हिंदी साप्ताहिकातील लेख वाचला. त्यामुळे नाईल नदी आणि राजा तुतनखामेनच्या कबरीने माझ्या मनावर असं काही गारुड केलं, की त्याच वेळी मी आयुष्यात एकदा तरी इजिप्तला भेट देण्याचा ठाम निर्धार केला.
माझ्या बकेट लिस्टमधील ही गोष्ट नुकतीच पूर्ण झाली. मी सपत्निक इजिप्तवारी करून आलो. इजिप्तमध्ये पोहोचल्यानंतर गंमत झाली. आमच्या विमानाला लँडिंगकरता जागा रिकामी मिळत नव्हती, म्हणून आमचं विमान इजिप्तची राजधानी कैरोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उंच आकाशात चकरा मारत होतं. त्यावेळी नुकताच सूर्य उगवला होता आणि संपूर्ण कैरो शहर सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये लखलखत होतं. उतरण्याकरता जागा मिळताच विमान उतरलं तसं आम्हीही विमानातून उतरून विमानतळावरचे सर्व सोपस्कार आटोपून एअरपोर्टच्या बाहेर पडलो. मुख्य दारावरच इजिप्तची प्राचीन संरक्षक देवी सेल्केटच्या दहा फूट उंच सोनेरी पुतळ्यानं आमचं लक्ष वेधलं. तिच्या डोक्यावर विंचवाची मूर्ती असून, दोन्ही हात पसरलेले होते आणि खाली लिहिलं होतं - वेलकम टू इजिप्त.