

Konark Sun Temple
esakal
शंतनू परांजपे
कोणार्ककडे आपण फक्त एक भव्य कलात्मक रचना म्हणून पाहू नये. ते एक कार्यरत जग होते. त्या जगात आदेश, जबाबदाऱ्या, अहवाल, बक्षिसे, दंड, प्रतिष्ठा, नाराजी आणि दीर्घकाळ चालणाऱ्या कामाचा थकवाही होता. या सर्वांना धरून ठेवणारे माध्यम म्हणजे बया चकादा ही नोंद. बया चकादा आपल्याला दाखवतो, की मध्ययुगीन भारतातील राजसत्ता केवळ दाने देणारी किंवा युद्धे करणारी नव्हती.
कोणार्कची जन्मकथा या सदराच्या मागील लेखात (विजयाचे मंदिररूपी स्मारक, ता. ५ सप्टेंबर) आपण नरसिंहदेवाचा राजकीय इतिहास बघितला. बंगाल मोहिमा, गौडेश्वर ही उपाधी, युद्धातून मिळालेली संपत्ती आणि सूर्यदेवतेच्या रथाच्या रूपात स्वतःच्या कारकिर्दीची आठवण टिकवण्याची राजाची इच्छा या सगळ्यांतून कोणार्कचा संकल्प आकाराला आला. परंतु राजाचा संकल्प आणि प्रत्यक्ष मंदिर यांच्यामध्ये एक कठीण आणि अत्यंत गुंतागुंतीचा प्रवास होता. त्या प्रवासात दगड होते, नद्या होत्या, ऋतू होते, कामगार होते, पैसा होता, विविध धार्मिक विधी होते आणि रोज घेतल्या जाणाऱ्या शेकडो छोट्या निर्णयांची मालिका होती. या सर्वांना एकत्र बांधणारी गोष्ट म्हणजे कोणार्कच्या मागे उभी राहिलेली संघटनरचना.
मोठ्या मंदिरांचा विचार करताना आपण बहुतेक वेळा राजाचे नाव, देवतेचे नाव, स्थापत्यशैली आणि शिल्पकारांचे कौशल्य यांवर भर देतो. पण एवढ्या मोठ्या मंदिरासाठी केवळ कौशल्य पुरेसे नसते. हजारो लोकांना वर्षानुवर्षे एका ठिकाणी कामाला ठेवणे, त्यांचे अन्न, निवास, वेतन आणि कामाचे विभाग सांभाळणे, शेकडो मैलांवरून दगड आणणे, वेगवेगळ्या कामांसाठी योग्य कारागीर नेमणे, त्यांच्यातील वाद मिटवणे, खर्चाचा हिशोब ठेवणे आणि शेवटी मंदिराच्या धार्मिक पूर्णतेपर्यंत सर्व घडामोडी व्यवस्थित पार पाडणे ही कामे सहज होऊ शकत नाहीत. कोणार्कच्या बाबतीत बया चकादा आपल्याला दाखवतो, की या सर्वांमागे जाणीवपूर्वक उभी केलेली एक विशिष्ट पदश्रेणी होती.