

Buddhist Caves in Maharashtra
esakal
कुडा म्हणजे दगडात कोरलेली एक सभ्यता, जहाजांवरून वाहणाऱ्या व्यापारवाऱ्यांचा प्रतिध्वनी, आणि कोकणाच्या अदृश्य वैभवाची अचूक आठवण. महाभोजांचं पुढे काय झालं, त्यांचं राज्य कधी लोप पावलं ही कथा अद्याप अपूर्ण आहे. परंतु कुडा लेणीसमूहानं इतिहासाचा धागा पुन्हा आपल्या हाती सोपवला. कदाचित उत्खननातून या कथेला शेवट मिळेल!
कुडा हे रायगड जिल्ह्यातलं एक प्रशांत खेडेगाव आहे, मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० किलोमीटर अंतरावर आणि माणगावच्या आग्नेय दिशेला २१ किलोमीटर अंतरावर वसलेलं. मुरुड-जंजिऱ्याच्या सान्निध्यात असल्यामुळे इथलं निसर्गसौंदर्य मनाला भुरळ घालतं. झाडांच्या सावलीत लपलेलं गाव आणि डोंगराच्या टेकडीतून अरबी समुद्राचं मनमोहक दृश्य, जणू काळानं आपल्या रहस्यांना समुद्राच्या लाटांशी जोडलंय की काय, असं वाटतं. आजूबाजूच्या मनमोहक निसर्गसौंदर्यामुळे पर्यटक आणि प्राचीन इतिहासाचे अभ्यासक इथं येतात. समुद्रतीराजवळील एका टेकडीत २६ शैलकृत गुहांचा संच आहे. इथून दिसणारं अरबी समुद्राचं दृश्य या लेण्यांच्या सौंदर्यात भर घालतं. त्या समुद्राच्या लाटांना मी इथं उभं राहून पाहतो आणि वाटतं की लेणी जणू लाटांशी बोलताहेत, त्यांचा रोमशी असलेला संबंध सांगताहेत!