देवेश गुप्ता
नदीचं खळखळणं, अधूनमधून लागणारी अवघ्या काही उंबऱ्यांची गावं, समान वास्तुरचना असलेली घरं, त्यांची रेखीव लाकडी दारं नि तावदानं, केसाळ दुभती जनावरं, रंगीबेरंगी कपड्यांतली सरळ-साधी माणसं, रस्त्यालगतची आणि लांबून दिसणारी बौद्ध धर्मस्थळं; अगदी सगळं सगळं झंस्कारची ओढ वाढवतं.
लडाख हे भारतातल्या हिमपर्वतरांगाचं माहेरघर. देश-विदेशांतल्या पर्यटकांचं, गिर्यारोहकांचं हे लाडकं डेस्टिनेशन! हिमालयातल्या कथांचं रोमांच या पर्वतरांगांच्या अंगाखांद्यावरून फिरताना आपल्याला जाणवतं.
नागमोडी रस्त्यावरून जाताना दऱ्याखोऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर होणारी स्पर्धा मनाला सुखावून जाते! उंच उंच हिमशिखरं, नद्यांची अगदीच निमुळती आणि खूप पसरट खोरी, बघतच राहावेत असे संगम, श्वास कोंडवणारे उंच पास, कधी घनदाट झाडींच्या तर कधी पूर्ण बोडक्या दिसणाऱ्या डोंगररांगा, संपन्न भूमी आणि वाळवंटी प्रदेश अशा विरोधभासी नैसर्गिक आविष्कारांनी लडाख प्रांत समृद्ध आहे.
कारगील आणि लेह या लडाखच्या दोन सहराजधान्या. २०१९मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकार इथल्या पर्यटन विकासाकडे चांगलंच लक्ष देत आहे.