धुक्यात हरवलेले कबीर साहेब

कबीर हे नावं मुळात अरबी भाषेतील ‘अल कबीर’ ह्या शब्दावरून घेण्यात आलेले आहे. त्याचा अर्थ ‘महान’ अथवा ‘श्रेष्ठ’ असा होतो.
kabir
kabiresakal

डॉ. राहुल हांडे

मगहर हेच कबीर साहेबांचे जन्मस्थान आणि निर्वाण स्थान आहे, याबाबत सर्वाधिक अभ्यासक-संशोधकांची सहमती असलेली दिसते.

एक तरुण विधवा ब्राह्मण युवती एकदा आपल्या पित्यासमवेत स्वामी रामानंद यांच्या दर्शनासाठी आली. ती युवती स्वामी रामानंद यांच्या आश्रमात सेवा करण्यासाठी राहू लागली.

एक दिवस ध्यानस्थ असताना तिच्या सेवाभावानं प्रसन्न झालेल्या स्वामी रामानंद यांनी तिला ‘पुत्रवती भव’ असा आशीर्वाद दिला. आपण विधवा आहोत हे त्या युवतीनं रामानंदांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आपला आशीर्वाद अनुचित आहे, याची स्वामी रामानंदांना जाणीव झाली.

आपल्या आशीर्वादामुळे ही युवती सामाजिकदृष्ट्या कलंकित मानली जाऊ शकते हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला आश्वस्त केले, की तुझा पुत्र हरी अनुरागी असेल आणि त्याच्या जन्मामुळे तुला कोणत्याही प्रकारचा कलंकदेखील लागणार नाही.

तिचा पुत्र जन्माला आला तेव्हा आकाशात नगाऱ्यांचे ध्वनी दुमदुमु लागले. आपण एका महान पुत्राला जन्म देत आहोत, याची जाणीव तिला झाली. असे असले तरी एक महिला म्हणून समाज आपला कलंकित समजेल ह्या भयामुळे तिनं हे बाळ एका तळ्याकाठी सोडून दिले.

तेथून जाणाऱ्या जुलाहा जमातीतील एका दांपत्याला हे बालक सापडले. त्यांनी त्याचे पालनपोषण केले. त्याचे नाव ‘कबीर’ असे ठेवण्यात आले. कबीर साहेबांची अशी जन्मकथा महाराज रघुराज सिंह यांच्या भक्तमाला रामरसिकावलीमध्ये देण्यात आलेली आहे.

कबीर हे नावं मुळात अरबी भाषेतील ‘अल कबीर’ ह्या शब्दावरून घेण्यात आलेले आहे. त्याचा अर्थ ‘महान’ अथवा ‘श्रेष्ठ’ असा होतो. इस्लाममध्ये अल कबीर हे परमेश्वराचे ३७वे नाव सांगण्यात आले आहे.

मतमतांतरांमुळे कबीरसाहेबांचे पालन-पोषण करणारे माता-पिता मुस्लिम असावेत की जन्मदात्या माता-पित्यापैकी एक मुस्लिम आणि एक हिंदू असावेत, अशा अनेक प्रश्नांची वलये निर्माण होतात.

कबीरपंथाचे अनुयायी कबीर साहेबांच्या माता-पित्यांसंदर्भात कोणतीच भूमिका घेण्यास तयार नसतात. कबीर साहेब हे नित्य, अमर आणि अजर आहेत, असा त्यांचा असा दृढ विश्वास आहे.

कबीर साहेबांची जीवनयात्रा सश्रद्धतेच्या कसोटीवर सोडल्यास काव्यातील विद्रोही कबीराचे आकलन होणे शक्य नाही. त्यामुळे येथे विवेकाची आणि संशोधनाची कसोटी लावणेच उचित असते.

kabir
Sant Tukaram Maharaj : तुका म्हणे धावा...पंढरी विसावा

कबीर साहेबांनी आपल्या माता-पित्याचा आणि जन्मस्थानाचा उल्लेख कुठेही स्पष्टपणे केलेला नसल्यामुळे याविषयी अनेक कथा-दंतकथांचा जन्म झालेला दिसतो. त्यांच्या जन्माविषयी कबीरपंथीयांचा पारंपरिक विश्वास असलेली कथा तर पौराणिक कथांशी मेळ खाणारी दिसते.

या कथेनुसार अमर व अजर असलेले कबीर साहेब इ.स.१३९८ सालच्या ज्येष्ठ मासातील पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर काशीजवळील लहरतारा तलावात कमळाच्या पानावर सशरीर अवतरीत झाले. त्यानंतर नीरु व नीमा नावाच्या जुलाहा दांपत्याने या बालकाला उचलून घरी नेले आणि त्याचे पालनपोषण केले.

ही कथा आणि त्यातील काशी हे स्थान याच्यापासून कबीर साहेबांच्या जन्मस्थानाची एक वेगळी कथा प्रारंभ होते. पारंपरिक मतानुसार त्यांचे जन्मस्थान काशी निश्चित करण्यात येत असले तरी त्यानंतरचे संशोधन याला मान्यता देत नाही.

यासाठी पहिले ‘दरसनु मगहर पाईओ पुनि कासी बसे आई’, ह्या कबीर साहेबांच्या पदाचादेखील आधार घेतला जातो. त्यामुळे त्यांचे जन्म आणि मृत्यू स्थान काशीपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेले मगहर हे गाव निश्चित करण्यात येते.

आताचे मगहर हे तालुक्याचे ठिकाण आजच्या उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात येते. पं. चंद्रबली पांडे हे संशोधक आपल्या विचार विमर्श नामक ग्रंथात कबीर साहेबांचे जन्मस्थान बनारसजवळील बेलहरा गाव सांगतात. आपल्या मताच्या समर्थनार्थ त्यांनी बनारस डिस्ट्रिक्ट गॅझेटियरचादेखील दाखला दिलेला आहे.

जुन्या महसुली दस्तावेजांमध्ये बेलहरा गावाचे नाव ‘बेलहर पोखर’ अथवा ‘बेलहरा पोखर’ असे आहे. कालौघात लोकांनी बेलहरमधील ‘लहर’ शिल्लक ठेवले आणि पोखरचे ‘तालाब’ केले. त्यामुळे त्याचे उच्चारण ‘लहर तालाब’ असे झाले.

ज्याचाच उच्चार पुढे ‘लहरतारा’ असा होऊ लागला, असे चंद्रबली पांडे महसुली नोंदीचा आधार घेत सांगतात. गुरु ग्रंथ साहिबचा आधार घेतला, तर त्यामध्ये कबीर साहेबांच्या ‘पहिले दरसुन मगहर पाईओ पुनि कासी बसे आई’ या पदावरून त्यांचे जन्मस्थान मगहर हेच आहे.

मगहर हेच कबीर साहेबांचे जन्मस्थान आणि निर्वाण स्थान आहे. याबाबत सर्वाधिक अभ्यासक-संशोधकांची सहमती असलेली दिसते.

कबीर साहेबांनी कायम आपला उल्लेख ‘काशीका जुलाहा’ असा केला आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मस्थानाचा विषय अद्याप संपूर्ण निकालात निघाला असे म्हणता येत नाही.

kabir
Sant Dnyaneshwar :भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण संत ज्ञानेश्वर!

कबीर साहेबांच्या मृत्यूस्थानाविषयी असाच संभ्रम कायम आहे. मगहर याठिकाणी कबीरदासांची कबर म्हणजे केवळ भ्रम आहे. अवध सुभ्यातील रतनपूर येथे कबीर साहेबांचे पार्थिव दफन केले होते. तेथेच कबीर साहेबांची समाधी आहे, असा दावा पं.चंद्रबली पांडे करतात.

मगहर येथील कबीर साहेबांची कबर वीर सिंह बघेल याला भ्रमित करण्यासाठी बिजली खाँ याने बनवली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू मगहरलाच झाला आणि त्यांना तेथे दफन करण्यात आले, या मताला पांडे मान्यता देत नाही.

यासाठी त्यांनी धर्मदास यांच्या काही पदांचा, गुरु ग्रंथ साहिब आणि कबीर ग्रंथावलीचे दाखलेदेखील दिलेले आहेत.

बहुत बरस तपु किआ कासी। मरनु भइआ मगहर को बासी। (धर्मदास)

जैसा मगहरु तैसी कासी हम एकै करि जानी। (गुरु ग्रंथ साहिब)

चरन विरद कासी का न दैहूं,कबीर भल नरकहि जैहूं। (कबीर ग्रंथावली)

कबीर साहेबांच्या समाधीविषयी आणखी काही मतमतांतरे आहेत. काही लोक त्यांची समाधी जगन्नाथ पुरी येथे आहे, असे सांगतात.

मगधला त्यांची समाधी आहे या मताचेही काही लोक समर्थन करतात. पंडित परशुराम चतुर्वेदी यांनी मात्र मगहर हेच कबीर साहेबांचे निर्वाण आणि समाधी स्थान असल्याचे निःसंदिग्ध प्रतिपादन केले आहे.

स्वतःला ‘काशी का जुलाहा’ संबोधणाऱ्या कबीर साहेबांचे उभे आयुष्य काशीत गेले. तसेच त्यांचे जन्मस्थान मगहर हे काशीपासून दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मगहर हे त्यांचे निर्वाण स्थान निश्चितच असू शकते.

कबीर साहेबांचे तत्त्वज्ञान आणि दोहे यांवर हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मांचा प्रभाव असल्यामुळे आणि त्यांचा जन्म व पालनपोषण याविषयी अनेक कथा प्रचलित असल्यामुळे हिंदू व मुस्लिम दोघांनीही त्यांच्यावर हक्क सांगितलेला दिसतो.

बाह्य धर्म संकल्पनेच्या पल्याड पोहोचलेले कबीर साहेब दोघांपैकी कोणालाच न समजल्यामुळे अखेर त्यांच्यासंदर्भात हा वाद निर्माण होणे, हे तसे दुर्दैवच म्हणावे लागते. मी हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही. मी तर ह्या दोहोंमध्ये लपलेला आहे. हे स्पष्ट करताना कबीर साहेब स्वतःच म्हणतात -

kabir
Sant Gadage Baba: दीनदुबळ्यांमध्ये देव शोधणाऱ्या संत गाडगेबाबांचे जुने फोटो

हिन्दू कहूं तो हूँ नहीं, मुसलमान भी नाही।

गैबी दोनों बीच में, खेलूं दोनों माही।।

हिंदू धर्म परंपरेतील उच्चतम आध्यात्मिक तत्त्वांचे प्रबळ समर्थक असलेल्या कबीर साहेबांनी आपल्या अनेक रचनांमध्ये ह्या तत्त्वांचा व सिद्धांतांचा केलेला चपखल वापर पाहता अनेक संशोधक-अभ्यासक आणि सर्वसामान्य अनुयायी यांना ते मूळचे हिंदूच आहेत, असा ठाम विश्वास वाटत आलेला आहे.

त्यांचे कबीरदास मुस्लिम असू शकतात हे त्यांच्या मनाला कदापि मान्य होत नाही. त्यांची जुलाहा जाती पूर्वाश्रमीची हिंदू होती, इस्लामच्या आगमनानंतर तिनं धर्मांतर केले, यासंदर्भातील सविस्तर विवेचन यापूर्वी आपण पाहिलेले आहे.

कबीर साहेबांचे पालन करणारी जुलाहा जमातीतील माता नीमा आणि पिता नीरु यांच्यासंदर्भात मतमतांतरे असलेली दिसतात.

ज्ञान सागर नावाच्या एका कबीर पंथीय ग्रंथात कबीर साहेब आपण पूर्वजन्मीचे ब्राह्मण आहोत असे म्हणतात असा, आणि त्याचबरोबर त्यांचे पोषक पिता नीरुदेखील पूर्व जन्मीचे ब्राह्मण असल्यासंदर्भात एक दाखला देण्यात आला आहे. याबाबत परंपरेने एक कथा सांगितली जाते.

नीमा-नीरु यांनी बालक कबीराला घरी आणल्यानंतर दूध न पिताही हे बालक धष्टपुष्ट होत आहे, हे पाहून आश्चर्यचकित झालेला नीरु आपली शंका दूर करण्यासाठी स्वामी रामानंद यांच्याकडे गेला.

त्यावेळी रामानंद यांनी त्याला सांगितले, की खरे तर तू पूर्वजन्मी ब्राह्मण होतास, मात्र परमेश्वराच्या सेवेत चुकभूल झाल्यामुळे तुला या जन्मात जुलाहा जातीत जन्म घ्यावा लागला.

ही परमेश्वराची कृपा समज, की तुला उद्यानात पुत्रप्राप्ती झाली. आपण ब्राह्मण आहोत, असे प्रतिपादन कबीर साहेबांनी काही दोह्यांमध्ये केलेले असल्यामुळे ह्या कथेवर विश्वास ठेवणाऱ्यांच्या दाव्याला समर्थन प्राप्त होते.

असे असले तरी कबीर साहेब ‘ब्रह्म जाणला तो ब्राह्मण’ या अर्थाने स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत असतील, ही शक्यता त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व आणि तत्त्वज्ञान पाहता नाकारता येत नाही. कबीर सागर ग्रंथात सदर कथेचे वर्णन खालीलप्रमाणे केलेले आहे.

पूर्व जन्म तैं ब्राह्मण जाती। हरि सेवा कीन्हसि बहु भांतीं।।

कछु तुव सेवा हरिं की चूका। तातें भया जुलाहा को रुपा।।

प्रौति प्रभु गहिं तोरी लीन्हा। तातें उद्यान में सुत दीन्हां।। (कबीर सागर)

कबीर साहेबांची माता मुस्लिम होती, असा दावा त्यांच्या रचनांमधील उल्लेखांवरून काही अभ्यासकांनी केलेला दिसतो.

रामनाम जपणारा व सदा भक्तीत तल्लीन असणारा आपला मुलगा स्वधर्माच्या विरोधात वागत आहे, भक्तीमुळे त्याच्या प्रपंचाची दुर्दशा झालेली आहे, अशी सदैव तक्रार करणारी कबीर साहेबांची माता त्यांच्या काही दोह्यांमध्ये आढळते.

यावरून त्यांचे आणि त्यांच्या आईचे मतभेददेखील असलेले दिसतात. काही लोकांनी कबीर साहेबांचे पिता नाथसंप्रदायी गोसावी (गोसाई) असल्याचेदेखील मत व्यक्त केलेले आहे.

मतमतांतरांच्या ह्या सर्व गदारोळात त्यांचे पालनपोषण करणारे नीरु व नीमा हे दांपत्य मुस्लिम जुलाहा होते, हे मात्र निश्चित आहे. नीमा हे नावं मध्ययुगात निम्नस्तरीय मानल्या गेलेल्या मुस्लिम स्त्रियांसाठी प्रचलित होते.

तसेच नीरु हे नाव पंजाब प्रांतात निम्नवर्गीय मानल्या जाणाऱ्या जुलाहा मुस्लिम समाजातील ‘नूरवफ’ ह्या नावाचे संक्षिप्त रूप आहे.

अशाप्रकारे आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते अंतिम श्वासापर्यंत आपला जन्म आणि धर्म-जात यांच्या धुक्यात हरवलेले कबीर साहेब स्वतःचा शोध घेत राहिले. त्यांना स्वतःमधील राम-रहीम यांचा शोध लागला; परंतु काही लोक आजही त्यांचा जन्म व धर्म-जात यांचा शोध घेत बसलेले दिसतात.

---------------------

kabir
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com