एका नवीन औषधाने शरीरातील एक विशिष्ट प्रथिन सक्रिय केल्यास गंभीर दोष निर्माण झालेले यकृत किंवा शस्त्रक्रिया करून अंशतः काढून टाकलेल्या यकृताची पुनर्निर्मिती होते. यकृतातील दोषांची दुरुस्ती वेगाने होऊ शकते.
मानवी शरीरातील यकृत म्हणजे एक ऊर्जा केंद्रच असते. शरीराला सातत्याने लागणाऱ्या ऊर्जेची निर्मिती, अतिरिक्त ऊर्जेचा साठा आणि आवश्यक तेव्हा तिचे वितरण करण्याचे कार्य यकृतामार्फत केले जाते. आपल्या सर्वांगीण आरोग्याच्या आणि स्वास्थ्याच्या बाबतीत यकृत एखाद्या महानायकाची भूमिका बजावते.
प्रथिने, कोलेस्ट्रॉल, जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके आणि पित्तरसाच्या निर्मिती आणि साठवणीसाठी यकृताचे कार्य बहुआयामी असते. मद्यार्क, औषधे आणि चयापचयातून निर्माण होणारे टाकाऊ आणि दूषित पदार्थांना नष्ट करून ते शरीराबाहेर उत्सर्जित करण्याचे त्याचे कार्य आरोग्यरक्षक असते.