संपादकीय
तो एक मासा आहे. सनफिश. नाव असं नाहीये काही त्याला, पण जपानमधलं शिमोनोसेकी हे त्याचं गाव. खरंतर शिमोनोसेकी हे त्याचं गाव आहे असं म्हणण्यालाही तसा फार काही अर्थ नाही, कारण मूळचा तो प्रशांत महासागरातल्या कोची या निसर्गरम्य पर्यटन-बेटांच्या परिसरातला. तिथून तो गेल्याच वर्षी शिमोनोसेकीतल्या काईयूकान मत्स्यालयात आला. आता तिथे काचेच्या एका महाकाय म्हणाव्या अशा पेटीत तो असतो. एकटाच...!
काचेच्या महाकाय पेटीत पोहत राहणाऱ्या महाकाय सनफिशला इतके दिवस दूरस्थ सोबत असायची ती मत्स्यालय पाहायला येणाऱ्या पर्यटकांची. त्याच्या आकाराची भुरळ पडत असणार त्यांना.
आपल्या साधारण परिचयाच्या गोल्ड फिशला सिल्व्हर रंग लावून तोंडाकडच्या बाजूने भिंगाखाली ठेवून पाहिला, तर त्याचं ते उघडं तोंड जसं दिसेल तसा दिसतो हा सनफिश. माशांच्या शास्त्रात मोला मोला म्हणून ओळखला जाणारा हा सनफिश असतो मात्र गोल्डफिशपेक्षा कितीतरी अगडबंब.