अर्थविशेष । भूषण महाजन
दीर्घकालीन गुंतवणूकदाराने संयम ठेवावा, क्वचित काही मोहरे बदलावेत आणि बाजार वरच जाणार आहे, ही खात्री ठेवावी. चीनची अर्थव्यवस्था ४.५ टक्के वृद्धी दाखवत आहे, तेव्हा काही परदेशी भांडवल तेथे वळवले गेले आहे. अमेरिकी, युरोपीय व आशियाई बाजारही तेजीत आहेत. परंतु आपली सीपची ताकद शेअर बाजाराला तारून नेईल असा होरा आहे. तेव्हा न गडबडता आपले धोरण आखावे आणि खरेदी विक्री करावी.
दोन पैलवान कुस्तीसाठी जेव्हा एकमेकांना भिडतात, तेव्हा प्रथम प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी खडाखडी सुरू होते. त्यात सुरुवातीला जमिनीकडे पाहत दोन्ही पैलवान एकमेकांना पकडून, एकमेकांवर जोर लावून लढतात.
यात दोघेही एकमेकांना खाली पाडण्याचा, एकेरी पट काढण्याचा किंवा चीतपट करण्याचा प्रयत्न करत असतात. कुस्तीमध्ये ‘खडाखडी’ किती वेळ चालेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. ते दोन्ही कुस्तीपटूंवर अवलंबून असते.
काहीवेळा काही मिनिटे, तर काहीवेळा जास्त वेळही लागू शकतो. आता हा खेळ संपणार कधी, असे प्रेक्षकांना वाटत असताना कुणीतरी एक वरचढ होतो आणि पुढे महाराष्ट्र केसरी होतो.