
क्लिप सुरू होते तेव्हा मंचाच्या बॅकड्रॉप-स्क्रीनवर Luis Von Ahn एवढंच लिहिलेलं असतं. त्या इमेजचा जो काही असेल तो उजेड आणि एक अगदी पॉइंटेड प्रकाशझोत वगळला तर मंचावर बाकी अंधार. आणि त्या प्रकाशझोतात मंचावर लुइस व्हॉन अह्न एकटाच. हा एक तरुण ग्वाटेमालन-अमेरिकी संशोधक-उद्योजक आणि क्राउडसोर्सिंग या कल्पनेचा एक जनक.
मंचावर लुइस एकटाच दिसत असला, तरी त्याच्यासमोरचे प्रेक्षागृह भरलेले असावे. जेमतेम दोन-सव्वादोन मिनिटांच्या त्या क्लिपमध्ये प्रेक्षकांच्या टाळ्यांचे, त्यांनी दिलेल्या प्रतिसादांचे आवाज तेवढे ऐकू येतात. क्लिप सुरू होताना उमटते ‘कॅप्चा’ असं लिहिलेली, संगणक वापरणाऱ्या सगळ्यांनाच परिचित असणारी आयताकृती चौकट.