Premium|Crispy Karanji Recipe : खुसखुशीत करंजी बनवायची आहे? वापरा या सोप्या रेसिपी

Magaj Wheel and Coconut Chimney Karanji Recipes : फराळाच्या ताटाची शोभा वाढवणाऱ्या मगज व्हील आणि कोकोनट चिमणी करंज्या घरच्या घरी बनवा. योग्य सारण, पिठाची तयारी आणि मंद आचेवर तळण्याच्या टिप्स जाणून घ्या.
Crispy Karanji Recipe

Crispy Karanji Recipe

esakal

Updated on: 

मीनाक्षी काटकर

करंजीची नाजूक अर्धचंद्रकोर फराळाच्या ताटाची शोभा वाढवते. सुबक आकाराची चविष्ट करंजी करणे ही सुगरणीची परीक्षाच असते. अशा या करंज्या खवय्यांना खेचून घेतातच...

मगज व्हील करंजी

वाढप

३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्य

पारीसाठी : दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी बेसन, २ चमचे कडकडीत गरम तूप, अर्धी वाटी रवा, चिमूटभर मीठ.

सारणासाठी : एक वाटी बेसन, अर्धी वाटी रवा, १ वाटी मगज बी पावडर, १ वाटी पिठीसाखर, पाव चमचा वेलची पूड, गरजेनुसार तूप.

कृती

मैद्यामध्ये बेसन व रवा एकत्र करावे. त्यात मीठ व गरम तूप घालून घट्ट पीठ मळावे. हे पीठ वीस मिनिटे झाकून ठेवावे. सारण करण्यासाठी कढईत चार चमचे तुपावर बेसन मंद आचेवर आठ ते दहा मिनिटे खमंग भाजावे. बेसनाचा रंग बदलला व सुवास आला, की त्यात रवा घालून दोन मिनिटे परतावे. मग या मिश्रणात मगज बी पावडर घालावी व गॅस बंद करावा. मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर त्यात पिठीसाखर व वेलची पूड घालावी. मिश्रण गरम असतानाच साखर घातली, तर मिश्रणाला पाणी सुटेल. आता मैद्याच्या पिठाच्या दोन मोठ्या व एकसारख्या पाऱ्या लाटाव्यात.

त्या पाऱ्या एकावर एक ठेवून मधला भाग स्टार आकाराच्या साच्याने काढून घ्यावा. एका पारीवर सारण ठेवून त्यावर दुसरी पारी ठेवावी व कडा नीट दाबून बंद कराव्यात. कढईत तेल गरम करून करंज्या मंद आचेवर तळून घ्याव्यात.

कोकोनट चिमणी करंजी

वाढप

३ ते ४ व्यक्तींसाठी

साहित्य

पारीसाठी : दोन कप मैदा, २ मोठे चमचे बारीक रवा, २ मोठे चमचे गरम तुपाचे मोहन, चिमूटभर मीठ आणि गरजेनुसार दूध किंवा पाणी.

सारणासाठी : दोन वाट्या खोबऱ्याचा बारीक कीस,

१ वाटी पिठीसाखर, २ चमचे मिल्क पावडर, १ चमचा वेलची व जायफळ पूड, तळण्यासाठी तूप किंवा तेल.

कृती

मैद्यामध्ये रवा, मीठ आणि गरम तुपाचे मोहन घालून हाताने एकत्र करावे. या मिश्रणात थोडे दूध किंवा पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. हे पीठ एक तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवा. सारण करण्यासाठी कढईत मंद आचेवर खोबऱ्याचा कीस परतावा. त्यात पिठीसाखर आणि वेलची व जायफळ पूड घालून मिश्रण चांगले एकत्र करावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर घालावी. मैद्याच्या पिठाचे लहान गोळे करून त्याच्या पातळ पाऱ्या लाटून घ्याव्यात. पारीच्या मध्यभागी एक ते दोन चमचे सारण भरावे. ओल्या बोटाने पारीच्या कडा दुमडून त्यांना चिमणीचा आकार देऊन बंद कराव्यात. कढईत तूप किंवा तेल तापवून त्यात मंद ते मध्यम आचेवर करंज्या दोन्ही बाजूंनी हलक्या सोनेरी रंगावर खुसखुशीत तळून घ्याव्यात.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com