

Maharashtra Drought
esakal
शेतीला पूरक इतर व्यवसायातून किंवा प्रयोगशीलतेच्या माध्यमातून शेतकरी जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या अनेक पदरी आव्हानांना तोंड देत आहे. तरीही इतर व्यवसायाच्या तुलनेत शेती व्यवसाय अशाश्वत आहे. त्यातच दुष्काळाची आपत्ती असेल, तर कृषी व्यवस्थेचे सर्व अर्थकारणच कोलमडून जाते, हे वास्तव आहे. आजच्या काळात शेतीवाडीत अवतरलेला ‘बखाडीचा दुष्काळ’ भीषण आहे. एका वर्षी पडलेला दुष्काळ पुढची काही वर्षे शेतकऱ्यांना गांजत असतो, यात शंका नाही.
यावर्षी कृषी व्यवस्थेवर भीषण संकट कोसळून शेतीवर असणारे सर्व अर्थकारणच कोलमडून गेले आहे. ‘सुनसान बसून असतात माणसं खेड्यापाड्यात रया नाही. भाळावरचे रुसले आभाळ त्याला थोडीही दया नाही’, अशी आज सर्वदूर गावखेड्याची अवस्था आहे. खरे म्हणजे सप्टेंबर महिन्यात, श्रावणात शिवारसृष्टीवर कशी सगळी चैतन्यकळा पसरलेली दिसते. श्रावण महिना म्हणजे सण-उत्सवाचा महिना. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ अशा वातावरणात सृष्टीचैतन्याचा गाभूळगाभा कसा ओथंबून आलेला असतो. घरातील बिजवाई शेतातून उगवलेली असते. त्यामुळे घरात, गावात अजिबात करमत नाही. गावात फक्त जर्जर झालेले, वृद्धत्वाने वाकलेले म्हातारे, म्हाताऱ्याच धापा टाकत असलेले दिसून येतात. बाकीचा तरुण वर्ग, बायका-माणसे शेतीच्या कामात मग्न असलेले दिसतात. शिवारातल्या पिकाने बाळसे धरलेले असते. त्याची आंतरमशागत करून म्हणजे डवरणी, निंदण करून आजच्या काळात योग्य वेळी रासायनिक खतांची योग्य मात्र देऊन, फवारणी करून बाळसे धरलेल्या पिकांना तारुण्याकडे नेण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर आलेली असते. त्यामुळे शिवारातील प्रत्येक शेतात बायका-माणसे काम करताना दिसतात; त्या कष्टातही परिसर रम्यतेमुळे आनंदाने भरलेला दिसून येतो.