प्रा. ज्योती रामकृष्ण जोशी
लेखिका जेव्हा आपल्या जीवनप्रवासाकडे मागे वळून पाहते, तेव्हा आपला एकटे राहण्याचा निर्णय योग्य होता असे तिला मनापासून वाटते.
‘न पटलेला माणूस गळ्यात बांधून घेण्यापेक्षा कोणी भेटलं मनासारखं तर करू लग्न!’ ही मोकळीक लेखिका स्वतःला देते, तेव्हा तिच्या धाडसाचे कौतुकच वाटते. विवाह नाकारताना या आत्मकथनात लेखिका अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडते.
लेखिका विनया खडपेकर यांच्या विवाह नाकारताना या पुस्तकाविषयी खूप उत्सुकता होती. अखेर ते हातात पडले. पुस्तक वाचून खाली ठेवले आणि माझ्या मनात पुस्तकाबद्दल आणि त्याला दिलेल्या शीर्षकाबद्दल काही विचार निर्माण झाले.
विनया खडपेकर यांचा जन्म १९४८चा, तर माझा १९६५चा. आमच्यात जवळपास एका पिढीचे अंतर. पण पुस्तकामुळे हे अंतर मिटून गेले. विनया खडपेकर यांनी त्यांच्या आत्मकथनात विवाहासंदर्भात जे मुद्दे मांडले आहेत, त्यांचा प्रथम विचार करूया.