प्रा. सुजाता राऊत
मनातलं कागदावर या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हटले आहे, ‘पानं, फुलं, वृक्षवल्ली, पक्षी, आकाश, सूर्य, नदी, पाणी, ऊन, पाऊस, माणसं, स्थळं सारा मोहमयी भोवताल यांनी माझ्या संवेदनशील मनाला साद घालून लिहितं केलं.’ त्याचा प्रत्यय पानापानांवर येतो. लेखिकेचा निसर्गातल्या प्राणशक्तीशी संवाद आहे.
ललित लेखन या वाङ्मयप्रकाराचे स्वतःचे असे एक रूप आहे. ते खरेतर कवितेचे विस्तारित रूप आहे. कथा लेखनाच्या चौकटीत बांधून ठेवता येणार नाहीत असे अनुभव विस्तृतपणे आणि मुक्तपणे ललित लेखनात मांडता येतात.
एखाद्या लहान आकृतिबंध असलेल्या ललित लेखनातही खूप खोलवर अनुभव देण्याची ताकद असू शकते. वाचकांचे मन बांधून आपल्या संवेदनांशी, अनुभवांशी एकरूप करण्याचे सामर्थ्य ललित लेखनात असते.