संपादकीय
विधानसभेच्या वातानुकूलित सभागृहात आणि रस्त्याच्या गल्लीगल्लीत सध्या एकच नारा घुमतो आहे तो म्हणजे ‘मराठीचा अभिमान’! लोकसभा निवडणुकांची धग शमत नाही, तोच विधानसभेच्या रणधुमाळीत राज्य बुडाले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणजंग जवळ येत आहे आणि त्याआधीच राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेत ‘मराठी’ केंद्रस्थानी येऊ लागली आहे.
मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता याभोवती राज्याचे राजकारण वेगाने फिरू लागले आहे. पण या साऱ्या राजकीय घोषणांआड मूलभूत प्रश्न डोकावतोय, तो म्हणजे मराठीसाठीचं हे प्रेम तात्पुरतं आहे की टिकाऊ? आणि हे प्रेम ‘महाराष्ट्र धर्मा’च्या मूळ तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे का?