Marathi Sahitya Sammelan
esakal
भारत सासणे
...मी थोडं घाबरत वळून पाहिलं. पण लक्षात आलं, आपण एकटे नाही. मागे परंपरा आहे. ज्यांनी सत्त्योच्चार केला आहे, अशा पूर्वाध्यक्षांना मी उभं पाहिलं. त्यांच्यामागे ग़ालिब होता, रूमी होता, मंटो होता. त्या गर्दीत भर्तृहरी होता, गुणाढ्य होता, खलील जिब्रान होता. संतकवी होते. ते सगळे माझ्या मागे उभे होते. सर्वांत मागे उभी होती सरस्वती!
पंचाण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो, तत्संबंधीचे अनुभव आणि आठवणी मी इथं सांगतो आहे. ‘निवड पद्धती’च्या आधी ‘निवडणूक पद्धत’ अस्तित्वात होती. म्हणजे इच्छुकाने उमेदवारी अर्ज भरायचा आणि ‘उभं’ राहायचं. यादीतील मतदारांनी मतं द्यायची. आता, हे इतकं साधं वाटत असलं, तरी साधं नव्हतंच. निवडणूक म्हटली, की त्यात अनेक दुष्प्रवृत्ती प्रविष्ट होत राहतात. त्याबद्दलच्या आठवणी किंवा अनुभव सांगायचे ठरवले, तर एक अडचण उद्भवते. ती ‘सरस्वती नावाची बाई’ लक्ष ठेवून असते. तिची नजर चुकवून काही ‘सांगता-उगाळता’ येत नाही. ‘वाईट आठवणी सांगायच्या नाहीत, निंदा करायची नाही,’ असं तिचं म्हणणं. ज्यांना साहित्यातलं फारसं काही कळत नाही त्यांच्यासमोर भिक्षा मागायला जायचं, तर या बाईने भिक्षेची झोळीच लपवून ठेवलेली. म्हणजे, भिक्षाही मागायची नाही. ही बाई निःश्वासाचाही हिशेब ठेवते, हे लक्षात आलं. तिथे, पदाधिकाऱ्यांपुढे ‘असलेली’ आणि ‘नसलेली’ शेपूट हलवण्याचा प्रश्नच नव्हता, कारण त्या बाईचा पहारा. हा पहारा चुकवता येत नाही. या ‘वीणा-वादिनी’ची जरब आहे. ‘पराभव झाला म्हणजे काय झालं?’ हा तिचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही. ‘तू लहान-मोठा झालास का?’ हा तिचा ‘ट्रिकी’ प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं? म्हणजे, तू आधीच ‘मोठा’ होतास, पराभवामुळे तू लहान कसा होशील, असा दिलासा या प्रश्नात दडला आहे असं म्हणावं, तर त्यात दुसराही अर्थ दडलाय. तू तसा ‘लहान’च होतास, पण या पराभवामुळे तू आणखी लहान झालास का, असाही खोचक प्रश्न आहे. उत्तर काही नाही दोन्हीकडून. उर्दू कवी म्हणतो, तसं ‘आह भरना भी मुश्किल’. पण मानवी मन विलक्षण आहे. मनानं ‘उपरणं’ घट्ट धरून ठेवलंय, माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी. जणू मी कोठे जाईन, बोलेन. बोलून सत्त्व घालवायचं नाही, असा सरस्वतीचा इशारा आहे. अवहेलना, अपमान, विश्वासघात इत्यादींमधून निर्माण झालेलं दुःखं आपल्याकडे लक्षपूर्वक पाहतं आहे, अशी जाणीव. आता दुःखाचेही नियम आहेत. म्हणजे ते व्यक्त करायचं नसतं. ते उच्चारायचं नसतं. ‘लबों पर लाया नहीं करतें’ असा नियम. म्हणजे, लक्ष ठेवून असणाऱ्या मनाच्या हातातून ‘उपरणं’ सोडवून घेऊन आणि दुःखाची पहारेदार नजर चुकवून कहाणी सांगायची आहे की काय?